मुंबई : मशिदींवरील भोंगे हटविण्याच्या राज ठाकरेंच्या भूमिकेवर संजय राऊत यांनी राज ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला होता. महाराष्ट्रात सभांवर कोणालाही बंदी नाही. आम्ही त्यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं आहे.ज्या पक्षाला दुसऱ्या पक्षाकडून ऑक्सिजन दिला जातो, त्यांच्याकडे का लक्ष द्यायचं? तसेच विचार भाड्याचा आहे, भूमिका भाड्याची आहे. प्रत्येक गोष्ट ही प्रायोजित असते, यावर का बोलायचं.” अशी घणाघाती टीका राऊतांनी केली होती. आता जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील राज ठाकरेंच्या भूमिकेवर आणि सभांवर टोला लगावला आहे.
जयंत पाटील म्हणाले, “राज ठाकरे नेहमीच भूमिका बदलतात आणि त्यासाठी वेगवेगळी कारणे असतात. पण ते भूमिका बदलतात हे महाराष्ट्राच्या लक्षात आले आहे. त्यामुळे लोक ते जे करतात ते फारसे गांभीर्याने घेत नाहीत. ते नकला चांगल्या करतात आणि ते बघण्यासाठी सभांना गर्दी होते. लोक गांभीर्याने घेत नाहीत याचे आत्मचिंतन करण्याची गरज राज ठाकरेंना आहे”.
रामदास आठवले काय म्हणाले होते?
राज ठाकरे यांच्या उत्तरसभेवर केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी सातारा येथे पत्रकार परिषेदेत बोलताना जोरदार निशाणा साधला होता. “भाजपचा मनसेला सोबत घेण्याचा निर्णय योग्य होणार नाही. आम्ही भाजपसोबत असल्याने त्यांनी मनसेला सोबत घेऊ नये. आरपीआय बरोबर असताना भाजपला मनसेची काय गरज. मनसेच्या सभांना गर्दी होते पण मते मात्रं मिळत नाहीत. मनसे हा आता मागे पडलेला पक्ष आहे. मनसेने हिंदुत्वाचा मुद्दा घेतला तरी त्यात काही एक फायदा होणार नाही. मनसेची फक्त एक जागा निवडून आली आहे”, असे रामदास आठवले म्हणाले होते.
महत्वाच्या बातम्या –