नक्षलवाद्यांनी विकासाच्या प्रवाहात यावे- राज्यपाल सी. विद्यासागर राव

गडचिरोली : तेलंगणा ही माझी जन्मभूमी तर महाराष्ट्र ही माझी कर्मभूमी आहे. आज होत असलेल्या पुलाचे लोकार्पण ही नवीन वर्षाची भेट आहे. मागील 50 वर्षापासून पाहतो आहे नक्षली हे नुकसानच करीत आलेले आहेत. राज्य शासनाने आदिवासी बांधवाना स्वावलंबनाचा मार्ग दाखविला असून नक्षलवाद्यांनी हिंसेचा, नुकसान करण्याचा मार्ग सोडून आता विकासाच्या प्रवाहात यावे, असे आवाहन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी केले.

सिरोंचा तालुक्यातील गोदावरी नदीवरील महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्यांना जोडणाऱ्या पुलाचे लोकार्पण राज्यपाल विद्यासागर राव यांच्या हस्ते शुक्रवारी झाले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. विशेष अतिथी म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

राज्यपाल पुढे म्हणाले, या पुलामुळे तेलंगणा, मध्यप्रदेश, छत्तीसगढ ही राज्ये महाराष्ट्राला जवळ आली आहेत. या पुलाच्या निर्मितीमुळे गडचिरोली जिल्ह्यात अनेक व्यवसायी संस्था येण्यास मदत होईल.

मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, महाराष्ट्र-तेलंगणा राज्यांनी जोडणारा हा पूल जिल्ह्याच्या विकासासाठी मैलाचा दगड ठरणार आहे. या पुलामुळे रोजगार निर्मितीलाही मदत होणार आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाचा शासनाचा संकल्प केला असून यासाठी राज्याची तिजोरी उघडी आहे असे ते म्हणाले.

स्वातंत्र्यानंतरही अनेक गावे वीज पुरवठ्याशिवाय आहेत. या गावांना 2019 पूर्वी वीज पुरवण्याचा निर्धार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. याच धर्तीवर गडचिरोलीचे जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांनी सादर केला. कार्यक्रमासाठी आपण जिल्ह्यातील या गावात वीज पोहचविण्यासाठी 20 कोटी रुपयांची तरतूद येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. जिल्ह्यात सिंचनाच्या माध्यमातून समृद्धी आणण्यासाठी जेवढ्या शेतकऱ्यांनी विहिरीसाठी अर्ज केले आहेत. त्या सर्व शेतकऱ्यांना विहिरी तयार करुन देण्यात येतील. तसेच त्या शेतकऱ्यांना वीज कनेक्शन सुद्धा देण्यात येईल, असेही ते म्हणाले.

मेडीगट्टा प्रकल्पामुळे या भागातील सिंचन समृद्धीत वाढ होण्यास मदत होणार असल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, कुणाचीही शेती व जमीन या प्रकल्पात जाणार नसून फारच थोडी जमीन या प्रकल्पात जाणाऱ्या शेतकऱ्यांचा रेडीरेकनर पेक्षा चारपट मोबदला देण्यात येईल. तसेच या प्रकल्पावर उपसा सिंचन योजना देखील कार्यान्वीत करणार असून मोठ्या प्रमाणात शेती सिंचनाखाली येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सूरजागड खनीज प्रकल्प जिल्ह्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण असल्याचे सांगून मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, या प्रकल्पामुळे औद्योगिक विकासाला चालना मिळणार असून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होण्यास मदत होईल. या खनीज प्रकल्पातून इतर सह उद्योगाला चालना मिळणार असल्यामुळे उद्योग व रोजगाराच्या संधी स्थानिकांना उपलब्ध होण्यास मदत होईल. गडचिरोली जिल्हा आता विकासाच्या वाटेवर आहे. मोठ्या प्रमाणात विविध विकास कामे जिल्ह्यात करणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

यावेळी गडकरी म्हणाले, जिल्ह्याच्या विकासात पुलांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे. पुलाची कामे वेळेत पूर्ण होतील. इथल्या वन, जल आणि खनीज संपत्तीमुळे गडचिरोली जिल्हा धनवान आहे. मात्र येथील लोक गरीबीचे जीवन जगत आहेत. त्यांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी सिंचन, रस्ते, उद्योग यासह अनेक योजना राबविण्यात येईल.

देशाचा विकास झाला पाहिजे हे प्रत्येकाला वाटते असे सांगून गडकरी म्हणाले, सिंचनासाठी पाणी, कृषी मालाला योग्य भाव आणि बेरोजगारांच्या हाताला काम मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. सिंचन, उद्योग आणि बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करुन देऊन जिल्ह्याचे चित्र बदलेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

देशात आज 22 लाख चालकांची आवश्यकता असल्याचे सांगून श्री.गडकरी म्हणाले, जिल्ह्यात वाहन चालक प्रशिक्षण संस्था व प्रदुषण नियंत्रण केंद्र सुरु करण्यासाठी 1 कोटी रुपयांची मदत करण्यात येईल तसेच जिल्ह्यातील 10 हजार युवकांना रोजगार उपलब्ध करुन देण्याचा आपला प्रयत्न राहणार असल्याचे गडकरी यांनी सांगितले.

यावेळी बोलतांना केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहिर म्हणाले, जिल्ह्यातील खनीज संपत्तीचा पुरेपूर वापर करण्यात येईल. पुलामुळे विकासाला गती मिळणार आहे. देशातील आदिवासी, गरीब हा विकासात मागे राहण्यामागे त्यांच्या विकासात येणारा अडथळा ही मुख्य समस्या आहे. नक्षल कारवायांना आळा घालण्यासाठी अशा पुलाची आवश्यकता होती. नक्षलग्रस्त भागाच्या विकासासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे सांगितले.

अर्थमंत्री मुनगंटीवार म्हणाले, मानव विकास निर्देशांकात गडचिरोली 34 व्या स्थानावर आहे. 12 हजार कोटीपेक्षा जास्त निधी जिल्ह्यांच्या रस्ते विकासासाठी गडकरी यांनी मंजूर केला आहे. गोंडवाना विद्यापीठ देशातील सर्वात चांगले विद्यापीठ बनविण्यात येईल यासाठी राज्यपालांनी देखील पुढाकार घेतला आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही. मोहाफूल उद्योगातून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून देण्यात येईल.

गडचिरोली येथे केंद्रीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु झाले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त करून श्री.मुनगंटीवार म्हणाले, जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती झाल्यास नक्षलवादापासून अनेकजण दूर जातील. वनउद्योग विकास महामंडळ गडचिरोली जिल्ह्यात सुरु करून अनेकांना रोजगार यातून उपलब्ध करून देण्यात येईल.

पालकमंत्री श्री.आत्राम म्हणाले, सिरोंचा भागाच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असून या पुलामुळे मोठी सुविधा निर्माण झाली आहे. येणाऱ्‍या काळात हा पूल विकासाचा मार्ग ठरणार आहे. सुरजागड प्रकल्पामुळे दहा ते वीस हजार युवकांना रोजगार मिळणार आहे. मेडीगट्टा प्रकल्पामुळे या क्षेत्राच्या विकासाला चालना मिळणार असून या प्रकल्पावर उपसा सिंचन योजना सुरु झाल्यानंतर येथील शेतकऱ्‍यांना बारा महिने सिंचनाची व्यवस्था होणार आहे. कोटगुल प्रकल्पालादेखील राज्यपालांनी मान्यता दिल्याचे श्री.आत्राम यांनी सांगितले. यावेळी मंत्री नागेश्वर राव, खासदार अशोक नेते यांनीही मार्गदर्शन केले.

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय, सार्वजनिक बांधकाम विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाच्या 683.72 किमी लांबीच्या कामासाठी 6659.79 कोटी रुपये मंजूर केले आहे. तसेच राष्ट्रीय महामार्गांतर्गत पुलांची कामे 0.945 किमी करीता 180 कोटी, 155 किमी नियतकालीन नुतनीकरणाच्या कामाकरीता 166.15 कोटी रुपये, 16 किमी केंद्रशासित रस्ते निधी अंतर्गत कामांसाठी 19.60 कोटी रुपये, 117.1 किमी डावी कडवी विचारसरणी अंतर्गत कामांकरीता 159.60 कोटी रुपये, 2.33 किमी डावी कडवी विचारसरणी अंतर्गत पुलाचे कामाकरीता 534.40 कोटी रुपये, आरआरपी 2 याकरीता 3942 कोटी रुपये आणि 202.20 किमी च्या ॲन्युटी वर्कस करीता 435.12 कोटी रुपये असे एकूण 1177.275 किमी साठी 12046.66 कोटी रुपये मंजूर केलेले आहे.

गोदावरी नदीवरील पुलाचे लोकार्पण केल्यानंतर मान्यवरांनी गडचिरोली -सिरोंचा- हैद्रराबाद या 536 किमी अंतर सेवा देणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या निम आराम बससेवेचा शुभारंभ हिरवी झेंडी दाखवून केला. तर मंचावर नागरिकांच्या आरोग्य पत्रिकेचेही मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन तसेच इंद्रावती व प्राणहिता नदीवरील मोठ्या पुलाचे भुमिपूजन देखील यावेळी करण्यात आले. गोदावरी नदीवर बांधण्यात आलेला पूल 1620 मीटर लांबीचा असून यावर 292 कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. तत्पुर्वी गोदावरी नदीवरील पुलाच्या बांधकामासाठी योगदान देणाऱ्या अभियंत्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.