आदिवासी भागातील मातामृत्यू रोखण्यासाठी ‘माहेरघर’ योजना प्रभावी

टीम महाराष्ट्र देशा : राज्यातील आदिवासी आणि दुर्गम, डोंगराळ भागातील गर्भवती महिलांसाठी ‘माहेरघर’ योजना आधार ठरत आहे. पालघर, नंदुरबार, नाशिक, नांदेड, यवतमाळ, अमरावती, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या नऊ जिल्ह्यातील 90 प्राथमिक आरोग्य केंद्रात ही योजना सुरू आहे. वर्षभरात सुमारे 3 हजारांहून अधिक महिलांचे ‘माहेरघर’मुळे सुरक्षित बाळंतपण करण्यात आले. संस्थात्मक बाळंतपणात वाढ होऊन आदिवासी भागातील माता व बालमृत्यू कमी करण्यासाठी योजना लाभदायक ठरत आहे.

दुर्गम भागात अवघड रस्ते असल्याने बाळंतपणासाठी गर्भवतींना वेळेवर आरोग्य संस्थांमध्ये पोहोचणे काहीसे जिकिरीचे बनते. त्यामुळे प्रसूतीच्या चार ते पाच दिवस आधी गर्भवतींना आरोग्य संस्थांमध्ये दाखल केले जाते. त्यांना माहेरघर योजनेतून सर्वंकष सेवा दिली जाते. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सध्या आदिवासी, डोंगराळ भागातील 90 आरोग्य संस्थांमध्ये ही सेवा सुरू आहे.

ठाणे परिमंडळातील पालघर जिल्ह्यातील 13 आरोग्य संस्थांमध्ये योजना सुरू आहे. नाशिक जिल्ह्यात दोन, नंदूरबार जिल्ह्यातील 10 आरोग्य संस्थांमध्ये तर लातूर परिमंडळातील नांदेड जिल्ह्यातील तीन आरोग्य संस्थांमध्ये ही योजना कार्यरत आहे. अकोला परिमंडळातील यवतमाळ जिल्ह्यात दोन तर अमरावती जिल्ह्यात नऊ आरोग्य संस्थांमध्ये योजना कार्यान्वित आहे. गोंदिया जिल्ह्यात 13, चंद्रपूर जिल्ह्यात सात तर गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक 31 प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये योजना सुरू आहे.







Loading…




Loading...