महाराष्ट्र सरकारला सत्तेत राहण्याचा अजिबात अधिकार नाही, राजीनामा द्यावा – जावडेकर

prakash javadekar

दिल्ली : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी वाझेला १०० कोटी वसुलीचं टार्गेट दिल्याचा गंभीर आरोप केला होता. आता मनसुख हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याने देखील लेटरबॉम्ब टाकत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणखी खळबळ उडवून दिली आहे.

एनआयए कोर्टासमोर वाझेचे हस्तलिखित पत्र सादर केलं आहे. या पत्रात सचिन वाझे याने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह शिवसेनेचे नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी देखील खंडणी मागण्यासाठी दबाव टाकल्याचा गंभीर आरोप केला आहे. SBUT वरील चौकशी थांबवण्यासाठी व बृहन्मुंबई महापालिकेच्या काही ठेकेदारांकडून पैसे वसूल करण्यास सांगितल्याचे सचिन वाझे याने आपल्या पत्रात नमूद केलं आहे.

हे पत्र काल माध्यमांमधून समोर आल्यानंतर महाविकास आघाडी सरकारच्या अडचणीत आणखी मोठी वाढ झाली आहे. भाजप नेत्यांनी सरकारवर हल्लाबोल केला असून केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन भाष्य केलं आहे. ‘जर तुम्ही या लुटीसाठी सत्तेत आला आहात, तर जनतेला देखील आपली ताकद दाखवावी लागेल. ही आघाडी निवडून आलेली नाही. भाजपा आणि शिवसेनेच्या युतीला जनतेने निवडून दिले होते.  शिवसेनेचे सर्व उमेदवार मोदींचा फोटो लावून जिंकून आले आहेत. मात्र शिवसेनेनं निकालानंतर विरोधी विचारधारेच्या पक्षांची साथ घेऊन धोक्याने सरकार स्थापन केलं,’ अशी टीका जावडेकर यांनी केली आहे.

पुढे ते म्हणाले,  ‘या आघाडीचं चारित्र्य या सगळ्या प्रकरणांमधून समोर आलं आहे. त्यामुळे मी मागणी करतो की महाराष्ट्र सरकारला सत्तेत राहण्याचा अजिबात अधिकार नाही. त्यांनी त्वरीत राजीनामा द्यायला हवा,’ अशी मागणी देखील जावडेकर यांनी केली आहे.

यासोबतच, त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व खासदार संजय राऊत यांचा एक व्हिडीओ दाखवून ते वाझेची पाठराखण करत असल्याचं सांगितलं. मात्र परमबीर सिंह यांच्या पत्रानंतर व आता एनआयएच्या तपासामुळे हे प्रकरण उलगडत असल्याने उद्धव ठाकरेंनी कोणतंही भाष्य केलेलं नाही. आता ते गप्प का आहेत ? असा सवाल देखील प्रकाश जावडेकर यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या :