मुंबई : राज्यात कोरोना लसीकरणाची तयारी जय्यत सुरु आहे. आज सीरम इन्स्टिट्यूटकडून राज्यासाठी लसीचे ९ लाख ६३ हजार डोस प्राप्त झाले आहेत. केंद्र शासनाच्या सूचनेनुसार त्याचे जिल्हानिहाय वाटप केले जाणार आहे. ३६ जिल्ह्यांमध्ये ५११ ठिकाणी लसीकरण सत्र घेण्यात येणार आहे. या ठिकाणी वीज, इंटरनेट, वेबकास्ट आदी सुविधा करण्यात आल्या आहेत.
राज्यात आतापर्यंत कोविन पोर्टलवर सुमारे ८ लाख लोकांची नोंद करण्यात आली आहे. राज्यात ३ हजार १३५ शीतसाखळी केंद्र उपलब्ध आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे व आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदिप व्यास यांनी दिली. दरम्यान, महाराष्ट्राच्या वाट्याला कमी डोस आल्याची खंत राजेश टोपे यांनी व्यक्त केली आहे.
ते म्हणाले, ‘मला समाधान आहे कि आपण आता पर्यंत सुमारे ८ लाख लोकांचा देता लसीकरणासाठी अपलोड केला आहे. मात्र, त्याच्या तुलनेत लस थोडी कमी आली आहे. पण जेवढी लस आली आहे ती लस आज रात्रीपर्यंत किंवा उद्या पहाटेपर्यंत सर्व विभागीय कार्यालयांमध्ये निश्चितपणे पोहोचेल. तर काही जिल्ह्यांमध्ये उद्या रात्रीपर्यंत लस पोहोचेल. तसेच 15 जानेवारीपर्यंत सर्व लसीकरण केंद्रांवर ही लस 100 टक्के पोहोचणार आहे.’ अशी माहिती त्यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना दिली आहे.
लसीकरण केंद्राच्या संख्या देखील घटवल्या !
राजेश टोपे यांनी ५११ लसीकरण केंद्राची सोय केली होती. मात्र, काल केंद्र सरकारसोबत झालेल्या बैठकीमध्ये केंद्राने सूचना दिली की, इतक्या मोठ्या स्तरावर लसीकरण करू नका. त्यामुळे केंद्राच्या सूचनेनंतर लसीकरण केंद्राची संख्या 511 वरुन 350 पर्यंत कमी करण्यात आला आहे. प्रत्येक लसीकरण केंद्रावर 100 जणांना लस देण्यात येईल. अशाप्रकारे पहिल्या दिवशी 35 हजार जणांना लस देण्याचा आमचा मानस आहे असं देखील राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- सोनू सूदने घेतली शरद पवारांची भेट; चर्चेला उधाण
- राज्य बोर्डाच्या १० वी, १२ वीच्या परीक्षांच्या निश्चित तारखांबद्दल महत्वाची माहिती !
- ‘मुस्लिम चार विवाह करतात मग धनंजय मुंडेंनी दोन केले तर काय बिघडलं?’
- कोरोना लसीकरणाची मनपाकडून जय्यत तयारी
- कोरोनाच्या ६० हजार लसी औरंगाबादेत दाखल, चार जिल्ह्यांचा साठा उतरवला