आगामी काळात शेतकऱ्यांना स्वस्त आणि खात्रीची वीज उपलब्ध होणार – मुख्यमंत्री

अहमदनगर : सोलर फीडरच्या माध्यमातून येत्या तीन वर्षात राज्यातील कानाकोपऱ्यात शेतकऱ्यांना वीज उपलब्ध करुन देण्यात येईल. त्यामुळे आगामी काळात शेतकऱ्यांना स्वस्त आणि खात्रीची वीज उपलब्ध होऊ शकेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. पारनेर तालुक्यातील राळेगणसिद्धी येथे आयोजित मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी प्रकल्पाचे भूमीपुजन तसेच ग्रामरक्षक दलाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सरपंच मेळावा कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे होते.

फडणवीस यांच्या हस्ते ग्रामरक्षक दलाची स्थापनेसंदर्भात कायद्याची ओळख करुन देणाऱ्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. सकाळ सोशल फाऊंडेशन, आसरा फाऊंडेशन आणि प्रजापिता ब्रम्हाकुमारी ईश्वरीय महाविद्यालयाच्या वतीने दिवाळीचे महत्व सांगणारे एक कोटीहून अधिक संदेश पाठविण्याचा जागतिक विक्रम करण्यात आल्याबद्दल मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते सत्कार कऱण्यात आला.

ऊर्जामंत्री बावनकुळे म्हणाले, शेतकऱ्यांना वीज देण्यासाठी पुढील १० वर्षाचे नियोजन करण्यात येत असून मुख्यमंत्री महोदयांच्या सूचनेनुसार मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना सुरु करण्यात आली. त्याअंतर्गत गावपातळीवर प्रकल्प उभारण्यात येणार असल्याने शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध होईल. राळेगणसिद्धी येथे सहाशे शेतकऱ्यांना याचा लाभ होईल. सरपंचांनी आपल्या गावात असा प्रकल्प उभा करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.अवैध दारुविक्रीविरोधात आणि वाढत्या व्यसनाधिनते विरोधात कारवाईसाठी प्रभावी योजना तयार करावी आणि त्याला कायद्याचे स्वरुप द्यावे, या अण्णांची सूचनेनुसार ग्रामसुरक्षादलाबाबत कायदा करण्यात आला. आगामी काळात ग्रामसुरक्षा दलाच्या माध्यमातून व्यसनमुक्त गावे तयार झालेली दिसतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

You might also like
Comments
Loading...