दुप्पट लोकसंख्या असून देखील गुजरातच्या तुलनेत महाराष्ट्राला कमी डोस – राजेश टोपे

tope - modi

मुंबई : महाराष्ट्राला कोरोना लसींचा पुरवठा होत नसल्याचा आरोप गेल्या दोन दिवसांपासून राज्य सरकारकडून केला जात आहे. केंद्र सरकार महाराष्ट्राला पुरेसा लशीचा साठा देत नसल्याचा आरोप केंद्रिय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी फेटाळून लावला असून महाराष्ट्रात लशीच्या तुटवड्यावरून केंद्र सरकार विरुद्ध राज्यातील महाविकास आघाडी सरकार अशा नवीन वादाला सुरुवात झाली आहे.

महाराष्ट्र सरकारच्या बेजबाबदारपणामुळे केंद्राच्या कोरोना विरुद्धच्या लढ्याला सुरुंग लागल्याचा गंभीर आरोप हर्षवर्धन यांनी केला आहे.डॉ. हर्षवर्धन यांनी यासंदर्भात एक प्रसिद्धिपत्रक जारी केलं आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे, गेले वर्षभर महाराष्ट्र सरकारने ज्या पद्धतीने गैरव्यवस्थापनाचा कारभार केला, त्यामुळे हे एकमेव राज्य कोरोना नियंत्रणातील देशाच्या लढाईत अडचणीचे ठरले आहे. आम्ही राज्य सरकारला सातत्याने मदत केली. त्यांना सर्व संसाधने उपलब्ध करुन दिली. केंद्रीय चमू पाठविल्या. पण, राज्य सरकारच्या प्रयत्नांनी काय झाले, याचा परिणाम आज आपल्यासमोर आहे. आज महाराष्ट्रात केवळ सर्वाधिक रूग्ण आणि सर्वाधिक मृत्यू नाहीत, तर जगातील सर्वाधिक संसर्ग दर सुद्धा महाराष्ट्रात आहे. टेस्टिंगमध्ये अजूनही सुधार व्हायला तयार नाही आणि रुग्णांचे संपर्क शोधण्यात सुद्धा कमतरता आहेत असं हर्षवर्धन म्हणाले आहेत.

दरम्यान, आता याच मुद्द्यावरून राज्य विरुद्ध केंद्र असा संघर्ष उभा राहण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. केंद्रीयमंत्री हर्षवर्धन यांच्या आरोपानंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. मला कुणाशी वाद घालायचा नाही वा मला कोणाला दोष देखील द्यायचा नाही. महाराष्ट्र मोठे राज्य आहे येथे आठवड्याला 40 लाख वॅक्सिन लागतात त्यामुळे त्या दिल्या जाव्यात इतकीच आमची मागणी असल्याच राजेश टोपे म्हणाले आहेत.

कोरोना लसीच्या कमी पुरवठ्यावरुन राजेश टोपे म्हणाले की, महाराष्ट्राला केवळ साडे सात लाख डोस दिल्यानंतर मी तातडीने केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्याशी बातचीत केलं. तसंच शरद पवार यांनीही त्यांच्याशी चर्चा केली. मी त्यांच्याकडे या दुजाभावाचा उल्लेख केला. 12 कोटी लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्रात सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या, पॉझिटिव्हिटी दर आणि मृत्यू दर सर्वाधिक असताना कोरोना लसीचे डोस एवढे कमी का दिले, अशी विचारणाही हर्ष वर्धन यांना केली.

गुजरातची लोकसंख्या महाराष्ट्रापेक्षा निम्मी आहे. परंतु गुजरातला आतापर्यंत एक कोटी लस मिळाल्या आहेत. तर त्या तुलनेत महाराष्ट्राला कमी डोस मिळाले आहेत. आम्हाला दर आठवड्याला किमान 40 लाख डोस हवे आहेत. इतर देशांना कोरोना लसीचा पुरवठा करण्यापेक्षा आपल्या राज्यांना त्याचा पुरवठा करावा. केंद्र सरकार आम्हाला मदत करत आहे. पण ज्या पद्धतीने मदत व्हायला हवी तशी होत नाही, असंही राजेश टोपे यांनी नमूद केलं.

महत्वाच्या बातम्या