fbpx

काँग्रेसच्या उद्यापासून महापर्दाफाश सभा; मुख्यमंत्र्यांच्या खोटारडेपणाची करणार पोलखोल

टीम महाराष्ट्र देशा:-राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय पक्ष चांगलेच सक्रीय झालेले आहेत. याच पार्श्वभूमीवर नेते आणि कार्यकर्ते वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन मोर्चेबांधणी करताना दिसत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा सध्या सुरु आहे . या यात्रेच्या माध्यमातून मुख्यमंत्री न केलेल्या कामाचे श्रेय घेण्यासाठी मोठमोठ्या घोषणा करून लोकांची दिशाभूल करत आहेत, असा आरोप करत आता काँग्रेस पक्ष राज्यभर महापर्दाफाश सभांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांच्या खोटारडेपणाची पोलखोल करणार आहे.

सोमवार दि. २६ ऑगस्ट रोजी अमरावती येथे पहिली महापर्दाफाश सभा होणार असल्याचे काँग्रेसतर्फे सांगण्यात आले आहे.राज्याच्या निवडणूक प्रचार समितीचे प्रमूख आणि माजी खासदार नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली आणि प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या सक्रिय मार्गदर्शनाखाली आणि उपस्थितीत होत असलेल्या या शुभारभांच्या सभेस ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि राज्यसभेतील विरोधीपक्षनेते गुलाम नबी आझाद, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जून खर्गे, ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, आ. पृथ्वीराज चव्हाण, विधीमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते आ. के. सी. पाडवी, विरोधी पक्ष नेते विजय वड्डेट्टीवार उपस्थितीत राहणार आहेत.

पहिल्या टप्प्यात विदर्भातील अमरावती, वर्धा, चंद्रपुर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, यवतमाळ,वाशिम, अकोला, बुलढाणा या जिल्ह्यात विविध ठिकाणी महापर्दाफाश सभा होणार आहेत. पुढच्या टप्प्यात मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि कोकण-मुंबई या विभागात सभा होणार आहेत.