खडसेंना एकट्यात भेटलात तर विचारा, भाजपात गेल्यावर कसं वाटतंं ? – बाळासाहेब थोरात

टीम महाराष्ट्र देशा :  विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकत भाजप किंवा शिवसेनेत प्रवेश केला आहे. दरम्यान पक्षांतर करणाऱ्यांना कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी टोला लगावला आहे. एकनाथ खडसेंना एकट्यात भेटलात तर विचारा, भाजपात गेल्यावर कसं वाटत ते, असा टोला थोरात यांनी लगावला. थोरात नाशिक येथे बोलत होते.

आगामी विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. सर्व पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरवात केली आहे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस – राष्ट्रवादी आघाडीला दारूण पराभव स्वीकारावा लागला आहे. दरम्यान लोकसभा निवडणुकीत दारूण पराभव झाल्याने विरोधी पक्षातील अनेक नेते भाजप तसेच शिवसेनेत प्रवेश करत आहेत.

दरम्यान पक्षांतरनावरून बाळासाहेब थोरात यांनी सरकारवर निशाणा साधला. भाजपाने सत्ता स्थापनेसाठी जे कर्नाटकात व गोव्यात केले ते अवघ्या देशाने पाहिले आहे. महाराष्ट्रातही फोडाफोडीचे राजकारण सुरु आहे. भाजप – सेनेची सत्तेची भूक भागत नाहीये. भाजप हा सत्तेचा हव्यास असलेला बकासूर असून एक दिवस पोट फुटून जाईल, अशी टीका थोरात यांनी केली.

इतकेच नव्हे तर भाजपातही अनेक दु:खी आहेत. सत्ता आल्यावर एकनाथ खडसेंना अडगळीत टाकण्यात आलं. एकनाथ खडसेंच्या वेदनाही समोर येत आहेत. असेही थोरात यांनी म्हंटले.  याचबरोबर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमधील अनेक जण भाजपात गेले. त्यांनी खडसेंना एकट्यात भेटल्यावर विचारावे भाजपात गेल्यावर तुम्हाला कस वाटत ते, असा टोलाही थोरात यांनी लगावला.