अजून किती लोकांचे जीव गेल्यानंतर महापालिकेचे होर्डिंग धोरण अस्तित्वात येणार ? – कॉंग्रेस

टीम महाराष्ट्र देशा : मुंबई महापालिकेच्या होर्डिंग धोरणावरून महाराष्ट्रकॉंग्रेसने  सेना-भाजप महायुतीवर निशाणा साधला आहे. सेना-भाजपने मुंबईकरांना किड्यामुग्यांप्रमाणे मरायला सोडले असून होर्डिंग कोसळून लोकांचा जीव जात असताना सुध्दा महापालिकेचे होर्डिंग धोरण अद्याप तयार नाही, अशी टीका कॉंग्रेसने केली आहे.

गेल्यावर्षी पुण्यातील जाहिरातीचे होर्डिंग काढत असताना ते कोसळले. त्यात चार जणांचा मृत्यू झाला होता. दोन महिन्यांपूर्वी ठाणे महापालिकेने परवानगी दिलेले काशिनाथ घाणेकर नाट्यगृहासमोरील मोबाईल होर्डिंग कोसळले होते. ते सायकल थांब्याच्या छतावर अडकले. अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. तसेच चर्चगेट येथील होर्डिंगचे पत्रे कोसळून एका पादचाऱ्याचा मृत्यू झाला. तर त्यानंतर ठाणे एसटी थांब्याजवळील होर्डिंग कोसळले. एवढ्या दुर्घटना होत असूनही मुंबई महापालिकेचे होर्डिंग धोरण अद्याप तयार नाही. असा आरोप करत कॉंग्रेसने सेना- भाजप महायुतीवर निशाणा साधला.

मुंबई महापालिकेचा मागील ८ महिने फक्त आणि फक्त अभ्यास सुरु आहे. अजून किती लोकांचे जीव गेल्यानंतर महापालिकेचा हा अभ्यास संपून होर्डिंग धोरण अस्तित्वात येणार आहे? असा सवाल कॉंग्रेसने केला.

इतकेच नव्हे तर, सेना – भाजप महायुतीने मुंबईकरांना किड्यामुग्यांप्रमाणे मरायला सोडले आहे. होर्डिंग कोसळून लोकांचा जीव जात असताना सुध्दा महापालिकेचे होर्डिंग धोरण अद्याप तयार नाही. असा आरोप कॉंग्रेसने केला.