पुणे शहर `स्टार्टअप`चे कॅपिटल म्हणून ओळखले जाणार- मुख्यमंत्री

पुणे : शिक्षण व सांस्कृतिक शहर म्हणून पुणे हे सर्वत्र ओळखले जात असले तरी येत्या काळात देशाचे `स्टार्टअप` चे कॅपिटल म्हणून पुणे शहर ओळखले जाईल. शासनाने पुणे विकास आराखड्याला मंजुरी दिली असून पुरंदर येथील नियोजित छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळाचा प्रश्नही मार्गी लावलेला आहे. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने असलेले हे उद्यान सर्वांना प्रेरणा देत राहील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

वडगाव शेरी वार्ड क्र. 3 येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण, जर्मन तंत्रज्ञानाने सुसज्ज संगीत कारंजे व मिनी ट्रेनचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला पालकमंत्री गिरीश बापट, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार अनिल शिरोळे, खासदार संजय काकडे, आमदार जगदीश मुळीक, नगरसेवक योगेश मुळीक आदी उपस्थित होते.

कार्यक्रमस्थळी आगमन होताच मुख्यमंत्री मिनी ट्रेनमध्ये बसून व्यासपीठावर विराजमान झाले. तत्पूर्वी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

मुख्यमंत्री म्हणाले, या उद्यानात बसविण्यात आलेले संगीत कारंजे जर्मन तंत्रज्ञानाने बनविलेले आहेत. भव्य अशा या उद्यानात मुलांना खेळता येईल. तर ज्येष्ठांना आनंद घेता येईल. शहरांमध्ये उद्याने विकसित केली पाहिजेत. जेणेकरुन नागरिकांना आल्हाददायी जीवन जगता येईल. पुणे शहराला ऐतिहासिक परंपरा आहे. पुण्याचे वैभव आपण जपले पाहिजे. वाढती लोकसंख्या पाहता त्यानुसार सोयीसुविधा उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. पुणे शहर हे `आयटी` हब म्हणून ओळखले जात आहे. याठिकाणी उद्योजक मोठ्या प्रमाणात येत आहेत. परदेशी उद्योजकांच्या दृष्टीने हे ठिकाण नेहमीच पसंतीचे राहिले आहे. त्यामुळे येत्या काळात देशाचे स्टार्टअप कॅपिटल म्हणून पुणे शहर ओळखले जाईल. आंतरराष्ट्रीय विमानतळाला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे तरुणांना रोजगार मिळेल. राज्यस्तरीय छाननी समितीचा अहवाल स्वीकारुन पुण्याच्या विकास आराखड्याला शासनाने मान्यता दिली आहे. त्यामुळे पुण्यातील पेठांचा विकास होईल. परिणामी सामान्य माणसांना दिलासा मिळेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री म्हणाले, आपण कॅशलेस व्यवहाराकडे वाटचाल करीत आहोत. पंतप्रधानांनी कॅशलेस व्यवहारासाठी नुकतेच `भीम` ॲप लाँच केले आहे. नागरिकांनी या ॲपचा वापर कॅशलेस व्यवहारासाठी करावा, असे आवाहन त्यांनी केले. नोटबंदीमुळे बँकामध्ये मोठ्या प्रमाणात पैसा जमा झाला आहे. त्यामुळे निश्चितच रोजगार वाढेल, असे त्यांनी सांगितले.

पुणे हे सांस्कृतिक राजधानी आहे. येथील लोक सुसंस्कृत आहे. गुण्यागोविंदाने राहणारे आहेत. त्यामुळे कुठल्याही प्रकरणावरुन गालबोट लागू नये याची दक्षता सर्वांनी घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

श्री.बापट म्हणाले की, मेट्रोमुळे नागरिकांचा वाहतुकीचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. आमदार जगदीश मुळीक यांनी येणाऱ्या काळात विविध विकास कामे पूर्ण करण्यात येणार आहेत, असे सांगितले. या कार्यक्रमाला वडगाव शेरी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You might also like
Comments
Loading...