महाराष्ट्रातील प्रत्येक खेडे फायबर ऑप्टिकने जोडणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अलिबाग : महाराष्ट्रात येत्या 2018 पर्यंत सर्व ग्रामपंचायती डिजीटल (फायबर ऑप्टीक) करण्यात येतील. या माध्यमातून सर्व गावे डिजीटल होऊन त्या माध्यमातून जलद विकास आणि सुविधा निर्माण केल्या जातील. यामुळे शहर आणि ग्रामीण भेद दूर होऊ शकेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

खारघर, नवी मुंबई येथे ग्राम विकास व पंचायत राज विभागामार्फत बांधण्यात आलेल्या “ग्राम विकास भवन” संकुलाच्या उद्धाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी गृहनिर्माण मंत्री तथा रायगड जिल्हा पालकमंत्री प्रकाश महेता, ग्रामविकास व महिला बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार मंदा म्हात्रे, माजी खासदार रामशेठ ठाकूर, जगदीश गायकवाड, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी, ग्रामविकास सचिव असीम गुप्ता, विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले की, ग्रामविकास विभागामध्ये संपूर्ण राज्याच्या विकासाचे चित्र बदलू शकेल एवढी क्षमता आहे. त्यामुळे सामान्यांच्या जीवनात बदल घडू शकेल, ग्रामीण भागाच्या विकासासाठी विविध केंद्र व राज्य शासनाच्या योजना या विभागामार्फत राबविल्या जातात. त्या प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रशिक्षण महत्वाचे आहे. ग्राम विकास विभागाच्या चांगल्या कामांचीही प्रशंसा करून मुख्यमंत्री म्हणाले की, पंडीत दीनदयाळ उपाध्याय घरकूल योजना, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना यातील लाभार्थ्यांना त्यांच्या खात्यात थेट निधी देण्याची अंमलबजावणी होत आहे. योजनांच्या यशस्वीतेसाठी ज्या जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांनी उत्कृष्ट कार्य केले त्यांचाही गौरव व अभिनंदन मुख्यमंत्र्यांनी केले.

ग्रामीण घरकुल योजनेंतर्गत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल जळगांव, ठाणे व सातारा येथील अधिकाऱ्यांचा विशेष उल्लेख करून त्यांनी जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी हे ग्रामीण प्रशासकीय व्यवस्थेत विकासाचा कणा असून त्यांनी मनात आणले तर जिल्ह्यात क्रांतीकारी व परिवर्तनीय कार्य घडते, असेही त्यांनी सांगितले. कागदावरील योजना प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी येत असताना स्थानिक पातळीवरील अडीअडचणी जे अधिकारी दूर करू शकतात. त्यामुळे योजना यशस्वीतेकडे जाते. शाश्वत विकासाची दिशा ठरविताना त्यात अधिकचे संशोधन महत्वाचे ठरते. तसेच त्यांनी बुलढाणा जिल्ह्याच्या मानव विकास कार्यदृष्टी अहवालाचे कौतूक केले, तसा अहवाल अन्य जिल्ह्याने देखील करावा असे निर्देश दिले.

ग्रामीण रस्ते विकासाचा महामार्ग असून त्याद्वारे आरोग्य, शिक्षण स्वहस्तेने पोहोचते. अर्थ व्यवस्थेला चालना मिळते. शहर व ग्रामीण दोन्ही भागांचा विकास होतो. मुख्यमंत्री ग्रामसडक योजना विभागामार्फत उत्तमतेने राबविली जात असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. महालक्ष्मी सरस प्रदर्शनातून महिला बचतगटांना मोठे आर्थिक पाठबळ मिळते. केवळ हे प्रदर्शनापुरते न राहता प्रत्येक जिल्ह्यासाठी महिला बचतगट मॉल तयार करून त्यांना कायमस्वरुपी विक्रीचे दालन मिळण्यासाठी विभागाने विचार करावा, असे ही त्यांनी सूचित केले. भविष्यात प्रशिक्षित वर्ग अधिक तयार करून बेरोजगारीचा प्रश्नही दूर करावा, असेही त्यांनी सांगितले.

श्रीमती मुंडे यांनी आपल्या भाषणात ग्रामविकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा आढावा मुख्यमंत्र्यांच्या समोर सादर केला. ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून सुरु असलेल्या योजना भविष्यात मोठी झेप घेऊन राज्याच्या विकासाचे नवे चित्र दाखविल, अशी आशा व्यक्त केली. विभागाच्या सर्व योजनांना मुख्यमंत्री महोदयांकडून मिळत असलेल्या सकारात्मक प्रतिसादाबद्दल त्यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. महिला बचतगटाबद्दल व महालक्ष्मी सरस प्रदर्शनाबद्दल त्यांनी माहिती दिली.

यावेळी मुख्यमंत्री व मान्यवरांच्या हस्ते केंद्र व राज्य पुरस्कृत योजनांचा निधी पीएफएमएस प्रणालीद्वारे थेट लाभार्थ्यांच्या खात्यावर वितरीत करण्याचा शुभारंभ करण्यात आला. ठाणे व सातारा जिल्ह्याच्या योजनेचा प्रात्यानिधीक शुभारंभ मुख्यमंत्री महोदयांनी केला. तसेच महालक्ष्मी सरस प्रदर्शनच्या वेबसाईटच्या मोबाईल ॲपचेही उद्घाटन त्यांनी केले. पं.दीनदयाळ उपाध्याय, ग्रामीण कौशल्य योजनेंतर्गत काही प्रशिक्षित युवकांना प्रात्यानिधिक स्वरुपात नियुक्तीचे आदेश तसेच स्वंयसहाय्यता गटांना समुदाय गुंतवणूक निधीच्या धनादेशाच्या प्रात्यानिधिक वितरणही त्यांनी केले.

श्री. गुप्ता यांनी आपल्या प्रास्ताविकाद्वारे ग्रामविकास विभागामार्फत सुरु असलेल्या उपक्रमांची तसेच ग्राम विकास भवन संकुलाची सविस्तर माहिती देऊन 35 कोटी रुपयांचे हे भवन बांधण्यामागचा उद्देश स्पष्ट केला. ग्रामीण सक्षमीकरणासाठी हे भवन उपयुक्त ठरेल असे सांगितले. तसेच या भवनासाठी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल सिडकोचे आभार व्यक्त करून सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. उपस्थित मान्यवरांना पुस्तकरुपी भेटही यावेळी दिली.

या कार्यक्रमासाठी राज्यातील जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच पदाधिकारी, अधिकारी, रायगडच्या जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश नार्वेकर, विभागाचे अधिकारी, कर्मचारी, महिला बचतगटांचे पदाधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन मानसी सोनटक्के यांनी केले तर आभार एमएसआरएलएमच्या संचालिका आर.विमला यांनी मानले.