‘अनाथ मुलांना कुटुंबाचे प्रेम मिळवून देऊ शकणारी प्रतीपालकत्व योजना क्रांतिकारी ठरणार’

yashomati thakur

मुंबई : एक मुलगी, आई अशा भूमिका मीदेखील बजावत आहे. त्यामुळे कुंटुंबाची, त्यांच्या प्रेमाची गरज याची जाणीव मला आहे. त्यामुळे अनाथ मुलांना कुटुंबाचे प्रेम मिळवून देऊ शकणारी प्रतीपालकत्व योजना क्रांतिकारी ठरणार असून अनाथ बालकांना घर मिळवून देण्याच्या कामाइतके मोठे पुण्य नाही, अशी भावना महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केली.

महिला व बाल विकास विभाग अंतर्गत पुणे येथील महाराष्ट्र राज्य बाल संरक्षण संस्थेच्यावतीने आयोजित तीन दिवसीय प्रतीपालकत्व प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोप आणि महिला व बाल विकास विभागाच्या अधिनस्त बालगृहातील अनाथ बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांना सुरक्षित कुंटुंब, घर मिळवून देणाऱ्या प्रतीपालकत्व (फॉस्टर केअर) योजनेची प्रायोगिक स्वरूपात सुरुवात आज ॲड. ठाकूर यांनी ऑनलाईन कार्यक्रमातून केली. यावेळी महिला व बाल विकास विभागाच्या सचिव आय. ए. कुंदन, महिला व बाल विकास आयुक्त डॉ. ऋषिकेश यशोद, सहायक आयुक्त मनीषा बिरासीस आदी उपस्थित होते.

यावेळी मंत्री ॲड. ठाकूर म्हणाल्या, अनाथ मुलांना कुटुंब मिळवून देण्यासाठी विभाग करत असलेले अथक प्रयत्न कौतुकास्पद आहेत. मुलांना फॉस्टर केअरच्या माध्यमातून घर मिळवून दिले, योजनेची नीट अंमलबजावणी झाली तर उद्याची युवा पिढी मानसिक, शारीरिक तसेच सामाजिकदृष्ट्या सक्षम होईल. भविष्यातील भारत घडविण्याचे कार्य यातून होईल. ही योजना प्रत्यक्षात येताना अनेक अडचणी येऊ शकतात याची मला जाणीव आहे; परंतु, अतिशय काळजीपुर्वक काम करत त्यावर मात करावी लागेल. या लेकरांना आपले समजून काम केल्यास नक्कीच आपण त्यांना न्याय देऊ शकू असा विश्वास व्यक्त करत ॲड. ठाकूर यांनी सर्व अधिकारी, कर्मचारी आणि विभागाला शुभेच्छा दिल्या. महिला व बाल विकास आयुक्त डॉ. ऋषिकेश यशोद म्हणाले, या योजनेबाबत जाणीव जागृती झाली तर अनेक कुंटुंबे पुढे येतील. या योजनेच्या यशस्वीतेसाठी विभाग सजग राहून अमंलबजावणी करेल.

‘साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती घराघरात आणि मनामनात साजरी करा’

काय आहे प्रतीपालकत्व (फॉस्टर केअर) योजना

बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ या कायद्याअंतर्गत अनाथ मुलांना महिला व बाल विकास विभागाच्या अधिनस्त बालगृहांमधे ठेवले जाते. कौटुंबिक वातावरणात राहण्याचा बालकांचा हक्क आणि त्यांच्या सर्वांगीण विकासाचा विचार करता दत्तक आणि प्रतीपालकत्व प्रायोजकत्व हे संस्थाबाह्य पर्यायही उपलब्ध आहेत. दत्तक प्रक्रियेत कायमस्वरुपी पुर्नवसन होते. परंतु सर्वच बालकांची दत्तक प्रक्रिया होतेच असे नाही. अशावेळी या बालकांचे कायदेशीर पालकत्व न देता त्यांना बाल न्याय कायद्यान्वये प्रतीपालकत्व योजनेत प्रायोजित पालकत्व देता येते. प्रतीपाकलकत्व म्हणजे बालकाला पर्यायी काळजीसाठी प्रायोजकत्व आणि प्रतीपालकत्व मान्यता समितीने निवडलेल्या योग्य कौटुंबिक वातावरणात ठेवणे.

प्रायोगिक तत्वावर पुणे, सोलापूर, अमरावती, मुंबई उपनगर आणि पालघरमध्ये अंमलबजावणी

कुटुंबात राहिल्याने मुलांचा सर्वांगीण विकास होत असल्याने महिला व बाल विकास विभागाकडून पुणे, सोलापूर, अमरावती, पालघर, मुंबई उपनगर या पाच जिल्ह्यात ही फॉस्टर केअर योजना प्रायोगिक तत्वावर सुरु करण्यात येत आहे. योजनेच्या तयारीच्या अनुषंगाने या पाच जिल्ह्यातील सर्व बाल संरक्षण यंत्रणांचे ऑनलाईन प्रशिक्षण घेण्यात आले. या योजनेतंर्गत प्रत्येक जिल्ह्यात ४० मुलांची निवड करण्यात येणार असून प्रतीपालकत्व पालकांना (फॉस्टर पॅरेंट्स) मुलांच्या संगोपनासाठी दरमहा दोन हजार रुपये देण्यात येणार आहे. प्रायोगिक अर्थात प्रतिपालकत्व स्वीकारून योजनेत भाग घेऊ इच्छिणारे पालक महिला व बालविकास आयुक्तालयाच्या https://wcdcommpune.org या संकेतस्थळावर अर्ज करू शकतील.

देवेंद्र फडणवीसांना झालंय तरी काय, प्रत्येकवेळी चुकीचा मुहूर्त काढताहेत- हसन मुश्रीफ