गुजरात निकाला आधीच भाजप कार्यकर्त्यांचे गुडघ्याला बाशिंग; जंगी जल्लोषाचे आयोजन

टीम महाराष्ट्र देशा: गुजरात विधानसभेच्या निवडणुकांचे निकाल उद्या जाहीर होणार आहेत. गेली २२ वर्षे गुजरातमध्ये भाजपची एकहाती सत्ता आहे. कधीकाळी गुजरातचे मुख्यमंत्री असणारे नरेंद्र मोदी हे आता देशाचे पंतप्रधान आहेत. त्यामुळे कधीनव्हे ते या निवडणुकीला देशाच्या राजकारणात महत्व आले आहे. अनेक संस्थाकडून जाहीर करण्यात आलेल्या पोलनुसार भाजपला निर्विवाद विजय मिळणार असल्याच दिसत आहे. त्यामुळे निकाल जाहीर होण्याआधीच जल्लोष साजरा करण्यासाठी भाजप कार्यकर्ते गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असल्याच दिसत आहे. कारण पुण्यातील अनेक व्हाटस्अॅप ग्रुप आणि सोशल मिडीयावर भाजप कार्यकर्त्यांकडून अशा प्रकारचे मेसेज पाठवले जात आहेत.

गुजरात विधानसभेच्या १८२ जागांसाठी दोन टप्प्यात मतदान पार पडले असून उद्या निकाल जाहीर होणार आहेत. हि निवडणूक भाजपसाठी प्रतिष्ठेची तर कॉंग्रेससाठी नवी उभारी घेण्याची बनली आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी हे याच राज्यातून येत असल्याने भाजपने संपूर्ण ताकदीने निवडणूक यंत्रणा राबवली. कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी देखील या निवडणुकीत चांगलाच प्रभाव टाकल्याचे दिसत आहे. राहुल यांच्या जोडीला पाटीदार नेता हार्दिक पटेल. तसेच जिग्नेश मेवानी आणि अल्पेश ठाकूर यांची साथ मिळाल्याने निवडणुकीत चांगलीच रंगत आली आहे. दरम्यान आता उद्या काय निकाल लागणार, तसेच सत्तेच्यागादीवर कोण विराजमान होणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.