मुंबई : सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट विरुद्ध उद्धव ठाकरे यांची शिवसेना असा संघर्ष सुरू आहे. शिवसेना पक्ष नेमका कोणाचा असा वाद रंगलेला असतानाच शिवसेनेचे विधिमंडळ कार्यालय सील करण्यात आल्याची मोठी बातमी समोर आली आहे. त्यामुळे हा शिवसेनेसाठी मोठा झटका मानला जात आहे. आज विधानसभा अध्यक्षांची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट व शिवसेना या दोघांकडूनही व्हीप जारी करण्यात आले आहेत. शिवसेनेकडून सुनील प्रभू यांनी राजन साळवी यांना मतदान करण्याच्या आदेशाचा व्हीप जारी केला आहे. तर दुसरीकडे शिंदे गटातील भरत गोगावले यांनी भाजपचे राहुल नार्वेकरांना मतदान करण्याच्या आदेशाचा व्हीप जारी केला आहे. यादरम्यान शिवसेनेचा विधिमंडळ कार्यालय सील करण्यात आल्याने मोठा वाद पेटण्याची शक्यता आहे. कारण याअगोदर झालेल्या शिवसेनेतील कोणत्याही बंडामध्ये विधानभवनातील शिवसेनेचे कार्यालय सील करण्यात आले नव्हते.
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड पुकारल्यानंतर जवळपास दोन तृतीयांश आमदारांची संख्या घेऊन ते सरकारमधून बाहेर पडले. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळले. आता एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत हात मिळवत सरकार स्थापन केले आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकी अगोदरच शिवसेनेचे विधिमंडळ कार्यालय सिल करण्यात आल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाले. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदावरून पायउतार झाल्यानंतर हे अधिवेशन बोलवण्यात आले आहे. या अधिवेशनात सत्ताधारी व विरोधक यांच्यामध्ये खटके उडण्याची ही शक्यता आहे. हे अधिवेशन राजकीय दृष्ट्या विशेष ठरणार आहे. या दरम्यान अगोदर विधानसभा अध्यक्षांची निवडणूक पार पडणार आहे.
शेवटी विधानसभेला मिळणार अध्यक्ष
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड पुकारल्यानंतर आपल्या सहकारी आमदारांसोबत भाजपशी हात मिळवणी करून सरकार स्थापन केले आहे. भाजप व शिंदे गटाकडे बहुमताचा आकडा असल्यामुळे त्यांचाच उमेदवार या विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय ठरेल असा त्यांना विश्वास आहे. गेल्या काही महिन्यांपासून विधानसभेचे अध्यक्षपदी रिकामेच आहे. नाना पटोले हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपदी गेल्याने त्यांनी विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून महाविकास आघाडी सरकार व राज्यपाल यांच्यातील वादामुळे हे पद रिक्तच राहिले आहे. त्यानंतर आता या पदासाठी भाजपकडून राहुल नार्वेकर तर महाविकास आघाडी कडून शिवसेनेचे नेते राजन साळवी हे रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे आता शेवटी विधानसभेला अध्यक्ष मिळणार आहेत.
महत्वाच्या बातम्या :
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<