महाराष्ट्र देशा इम्पॅक्ट: भैय्याजी जोशी घेणार भाजपमधील असंतुष्ट बहूजनांची भेट

भाजपमधील असंतुष्ट बहूजनांच्या बातमीची संघ आणि भाजपने घेतली वरिष्ठ पातळीवर दखल

औरंगाबाद /अभय निकाळजे(वरिष्ठ पत्रकार ):  भाजपमधील असंतुष्ट आणि विशेषतः मुंडे-महाजन गटातील कार्यकर्ते अस्वस्थ आहेत. ते बंडाच्या तयारीत असल्याचे वृत्त महाराष्ट्र देशाने प्रसिद्ध केले होते. त्या वृत्ताची भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ पातळीवर जबरदस्त दखल घेतली. त्यातून मार्ग काढण्यासाठी संघाचे सरसंघ चालक मोहनजी भागवतांनंतरचे भैय्याची जोशी हे त्या बहूजन कार्यकर्त्यांची भेट घेणार आहेत. ही भेट भाजपच्या मुंबईतील अधिवेशनापुर्वी होण्याची शक्यता असल्याचे सुत्रांनी सांगितले.

मुंडे-महाजन यांच्या गटातील कार्यकर्त्यांना एक-एक करून भाजपमधून बाहेर पडायला भाग पाडले जात आहे. त्यांना जे पद मिळविण्याची क्षमता आणि पात्रता आहे, अशा ठिकाणी त्यांना बहूजन समाजातून असल्याने डावलले जात असल्याबद्दलची चर्चा महाराष्ट्र देशाने पहिल्यांदा जाहीरपणे मांडली. त्याची संघाच्या पातळीवर दखल घेणे स्वाभाविक होते. कारण त्यामध्ये सामाजिक समरता मंचच्या पदाधिकाऱ्यांनीच या बहूजन समाजातील कार्यकर्त्यांना डावलल्याचा थेट आरोप केला होता. त्यामुळे संघाच्या एका चिंतन बैठकीत अतिशय गांभीर्याने त्यावर चर्चा केली गेली. त्यातून सामाजिक समरता मंचच्या कार्यकर्त्यांबद्दल शंका निर्माण झाल्याने त्यांच्याविरोधात संघातील नेत्यांनीच बोलणे योग्य होईल, असे ठरले.

त्यानुसार भैय्याजी जोशींनी त्यामध्ये पुढाकार घेण्याचे सांगण्यात आले. त्यांनीही औरंगाबादेत येऊन बहूजन कार्यकर्त्यांशी चर्चा करण्याचे निर्धारीत केले आहे. मुंबईतील अधिवेशनापुर्वी ही चर्चा आपेक्षित आहे. या कार्यकर्त्यांचे पुर्नवसन करण्याच्या दृष्टीने ही चर्चा होणार आहे. त्यात पंकजा मुंडे यांनाही विचारात घेतले जाणार आहे. भैय्याजी जोशींना संपुर्ण परिस्थितीची माहिती दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर ते कुणा-कुणाशी चर्चा करतील, हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल. तर भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारीणीतील एक असंतुष्ट शिरीष बोराळकर यांनी त्यांच्या भावना थेट पंतप्रधानांपर्यंत पोहोचविल्या आहेत. त्यामुळे तेही या संदर्भात थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींशी चर्चा करणार असल्याचे वृत्त आहे.