महंत भास्करगिरी यांनी अध्यक्षपद नाकारले ?

राहुल कोळसे , देवगड : संपूर्ण महाराष्ट्रातील वारकर्‍यांचे दैवत असलेल्या पंढरपूर येथील विठ्ठल रुख्मिनी मंदिराचा कारभार पाहणार्‍या विठ्ठल-रुख्मिनी मंदीर समितीची शासनाने स्थापना केली असून या समितीचे सदस्यत्व भूषविण्याचा मान श्रीक्षेत्र देवगडचे महंत भास्करगिरी महाराज यांना प्राप्त झाला असून राज्यपालांच्या आदेशानुसार शासनाचे विधी व सल्ला विभागाचे प्रधान सचिव एन. जे. जमादार यांच्या सहीने विश्‍वस्तांची निवड झाली आहे.

या समितीच्या अध्यक्षपदी डॉ. अतुल सुरेश भोसले यांची निवड जाहीर झालेली असून अध्यक्षांसह एकूण 9 सदस्य या समितीत आहेत. त्यातील एक अनुसूचित जाती, एक अनुसूचित जमाती, एक विधानसभा सदस्य, एक स्थानिक नगराध्यक्ष व सर्वसाधारणमधून तीन सदस्य अशी रचना आहे. भास्करगिरी महाराज यांची सर्वसाधारणमधून नियुक्ती करण्यात आली. भास्करगिरी महाराज यांची विठ्ठल-रुख्मिनी मंदिराचा कारभार पाहणार्‍या समितीच्या विश्‍वस्तपदी नियुक्ती झाल्याबद्दल नगर जिल्ह्यात अनेक भक्तांनी आनंद व्यक्त केला आहे.

दरम्यान मुख्यमंत्र्यांनी अध्यक्ष निवड जाहीर करण्यापूर्वी भास्करगिरी महाराज यांच्याकडे अध्यक्षपद स्विकारण्याबाबत बोलणी केली. मात्र भास्करगिरी महाराज यांनी नम्रपणे हे पद नाकारले असल्याचे समजते.

समिती पुढील प्रमाणे

डॉ. अतुल सुरेश भोसले (अध्यक्ष), रामचंद्र शिवाजी कदम (विधानसभा सदस्य), श्रीमती शकुंतला विजयकुमार नडगिरे (महिला), दिनेशकुमार सदाशिव कदम (अनुसूचित जाती), सचिन नागनाथ अधटराव (अनुसूचित जमाती), भास्करगिरी गुरु किसनगिरी बाबा(सर्वसाधारण), गहिनीनाथ ज्ञानेश्‍वर महाराज (औसेकर) (सर्वसाधारण), संभाजी हिरालाल शिंदे (सर्वसाधारण), नगराध्यक्ष पंढरपूर (पदसिद्ध सदस्य).