महाआघाडी हा व्यवहार्य पर्याय नाही; पवारांनी महाआघाडीची शक्यता फेटाळली 

नवी दिल्लीः भाजपाविरोधी सर्व पक्षांची मोट बांधून, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीला समोर जाण्याचे कॉंग्रेसचे मनसुबे आहेत. त्यासाठी कॉंग्रेस पुढाकार घेताना देखील दिसून येत आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्या शपथविधीच्यावेळी देखील सर्व विरोधकांनी एकत्र येत जोरदार शक्तिप्रदर्शन केलं होत. मात्र आता, महाआघाडी अस्तित्वात येणं शक्य नसल्याचं मत शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे. ते एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

शरद पवार यांच्या या वक्तव्यामुळे आता कॉंग्रेसच्या मनसुब्यांवर पाणी फिरण्याची शक्यता आहे. पंतप्रधानपदाचा उमेदवारही निवडणुकीनंतरच ठरेल, असंही त्यांनी म्हंटलं आहे. ‘माझ्या मते, महाआघाडी हा व्यवहार्य पर्याय नाही. आजची परिस्थिती ही 1977 सारखी आहे. तेव्हा, इंदिरा गांधी समर्थ नेत्या होत्या. देशाच्या पंतप्रधान होत्या. पण, आणीबाणीनंतर काश्मीर पासून कन्याकुमारीपर्यंतच्या जनतेनं त्यांच्याविरोधात मतदान करून काँग्रेसला पराभूत केलं. त्या निवडणुकीत कुठलाही राजकीय पक्ष किंवा आघाडी नव्हती, तर निवडणुकीनंतर सगळे विजयी पक्ष एकत्र आले आणि जनता पक्षाचं सरकार अस्तित्वात आल्याचंही यावेळी पवार म्हंटले.

तर दुसरीकडे आम्हाला गृहित धरू नका, असं सूचित करत माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा यांनी देखील, जेडीएस आघाडीसाठी फारस उत्सुक नसल्याचे संकेत दिले आहे. त्यामुळे आता सर्व विरोधीपक्षांना एकत्र घेऊन भाजप विरोधात २०१९ ची निवडणूक लढवण्याचे मोठे आव्हान असणार आहे.

… तर मायावतींनी भाजपला पाठींबा द्यावा – रामदास आठवले