महागाईच्या विरोधात उद्या राष्ट्रवादीचे ‘जन हाहाकार’ आंदोलन

blank

पुणे:-  पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस, जीवनावश्यक वस्तूंच्या भाववाढीविरोधात उद्या (शनिवारी) माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस जन हाहाकार’ आंदोलन करणार आहे. याबाबत राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

मोर्चाचा प्रारंभ काळेवाडीतील पाचपीर चौकातून शनिवारी दुपारी तीन वाजता होईल. पिंपरी कॅम्प, डीलक्‍स चौक, पिंपरी बाजारपेठ, भाटनगर यामार्गे आंबेडकर चौकात मोर्चाचे सभेत रुपांतर होईल.

संजोग वाघेरे म्हणाले की, भारतीय जनता पक्षाने लोकसभा, विधानसभा निवडणुकीत महागाई भ्रष्टाचाराचे मुख्य मुद्दे उपस्थित केले. अच्छे दिनाचे वादे करून, बहूत हुई महंगाई की मार, आपकी बार भाजप सरकार! अशा लोभस घोषणा दिल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्व नेत्यांनी नाना प्रकारच्या आश्वसनांची बरसात केली. त्याला जनतेने भुलून सत्तेसाठीचे धो धो बहुमत भाजपला दिले. मोदी सरकारच्या गेल्या साडे तीन वर्षाच्या काळात “त्या” बाता एकेक करीत “थापा” असल्याच उघडकीस येत आहे.

जीएसटी, नोटबंदी फसली आहे. देशाचा विकास दर घटला आहे. पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत भरमसाठ वाढ झाली आहे.

यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. शेतक-यांची फसवी कर्जमाफी, शेतक-यांच्या मालाला हमीभाव नाही. महिला, युवती सुरक्षित नाहीत. अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. भ्रष्टाचारामध्ये वाढ झाली आहे.