पत्रकारांच्या प्रश्नावर जानकर संतापले, म्हणाले….

टीम महाराष्ट्र देशा:- मुख्यमंत्र्यानी सांगितल्यास भाजपच्या चिन्हावर निवडणुक लढवाल का? असा प्रश्न माढ्यातील पत्रकारांनी विचारताच पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर भडकले. किती वेळा हा प्रश्न पत्रकार मला विचारत आहेत. तुम्ही मूर्ख आहात काय? असे म्हणत त्यांनी पत्रकारांवर नाराजी व्यक्त केली.त्यांनी माढा येथे शासनमान्य शिवलाल रामचंद वाचनालयास शनिवारी भेट दिली. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते पत्रकारावर भडकले.पत्रकारांबद्दल आक्षेपार्ह-खालच्या पातळीवरचे विधान केल्याबद्दल जानकर यांचा पत्रकारांकडून निषेध केला जात आहे.

तसेच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या भाजप-शिवसेना पक्ष प्रवेशांवर बोलताना ते म्हणाले, की पक्ष वाढीच्या दृष्टीने जो तो पक्ष प्रयत्न करत आहे. ज्या भागात पक्ष कमकुवत आहे, त्या ठिकाणी याचा मोठा फायदा होईल. राज्यात आणि केंद्रातही युतीचे सरकार असल्याने पक्ष प्रवेशाचे वारे असेच सुरू राहील असे ही जानकर यावेळी म्हणाले.

मुख्यमंत्र्यानी सांगितले तर कमळ चिन्हावर निवडणुक लढवली जाईल का ? या प्रश्नावर ते पत्रकारांवरच भडकले. म्हणाले की,मी हजार वेळा सांगत आलोय तुम्ही ऐंकल असेल ना? सारखं तेच विचारायला पत्रकार मुर्ख आहेत काय? मी पक्ष कशाला काढलाय, आमच्या पक्षाच्या चिन्हावरच लढू. असे जानकर म्हणाले.

आता धनगर आरक्षणाचे काय ? असे विचारले असता, धनगरांना आरक्षण मिळाले असल्याचे आश्चर्यकारक वक्तव्य त्यांनी केले. आदिवासीच्या योजना लागू झाल्यात की. मुळात आदिवासी समाजाच्या २२ योजनांमध्ये धनगरांना लाभ देण्यासाठी राज्य शासनाने १ हजार कोटींची आर्थिक तरतुद केली आहे. यावर अमंल झालेला नसल्याने यांचा लाभ एकाही धनगराला मिळालेला नाही. अशातच धनगर आरक्षण जाहीर झालेले नसताना जानकरांनी धनगरांना आरक्षण मिळाल्याचे म्हटल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.