शरद पवारांनी धनगर आरक्षणाचं वाटोळं केलं, बारामतीतील धनगर त्यांना जागा दाखवतील

टीम महाराष्ट्र देशा : आधी मुलगी आणि पुतण्यासाठी राजकारण करणारे शरद पवार आता नातवांना देखील राजकारणात आणत आहेत. शरद पवार यांनीच धनगर आरक्षणाचं वाटोळं केल, आता धनगर समाज त्यांना जागा दाखवेल, अशी टीका रासप नेते महादेव जानकर यांनी केली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार कांचन कुल यांच्या इंदापूर येथील प्रचार सभेत ते बोलत होते.

यावेळी महादेव जानकर म्हणाले की, धनगर समाजाच्या आरक्षणाची कोणी वाट लावली असेल तर ती शरद पवार यांनी लावली आहे. त्यामुळे धनगर समाजाला आरक्षण कोण देणार असेल, तर देवेंद्र फडणवीसचं फक्त धनगर समाजाला आरक्षण देऊ शकतात असा विश्वास महादेव जानकर यांनी व्यक्त केला. शरद पवार यांची नियत चांगली असती, तर आता देवेंद्र फडणवीस यांना धनगर आरक्षणासाठी जन्म घ्यावा लागला नसता, असा प्रहार जानकर यांनी केला. पुढे जानकर म्हणाले की, शरद पवार यांना आता आम्ही मंत्री झालेलं पहावत नाही. त्यांच्या पोटात दुखत आहे, अशी टीका जानकर यांनी केली.

तिसऱ्या टप्यातील लोकसभा मतदारसंघासाठी २३ एप्रिल रोजी मतदान होणार आहे, तत्पूर्वी आज संध्याकाळी पाच वाजता प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. अटीतटीचा सामना रंगलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात आज राष्ट्रवादी तसेच भाजपने रॅली आणि सभांचा धडाका लावला आहे, तर संपूर्ण पवार कुटुंबीय मैदानात उतरले आहे. युतीकडून देखील भाजपच्या उमेदवार कांचन कुल यांच्या प्रचाराचा धडाका लावण्यात आला आहे. कांचन कुल यांच्या विजयासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , राज्यमंत्री विजय शिवतारे, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जोर लावला आहे.







Loading…




Loading...