आई-वडिल अन् मित्रांमुळेच जिंकलो, युपीएससी परीक्षेत बार्शीच्या महादेव धारुरकरची गरुडझेप

बार्शी – (प्रतिनिधी) युपीएससी परीक्षेचा निकाल लागला तेव्हा मी पुण्यात मित्रांसोबत होतो. निकाल पाहताक्षणी आनंद झाला, कधी एकदा फोन करुन वडिलांनी ही बातमी सांगतोय असे झाले होते. माझ्या यशाचे श्रेय माझ्या पाठीशी उभ्या राहणाऱ्या माझ्या आई-वडिलांना आणि मित्रांना देत असल्याचे UPSC परीक्षा पास झालेले बार्शीचे पुत्र महादेव धारुरकर यांनी व्यक्त केली आहे. तसेच योग्य मार्गाने तयारी करण्याचा संदेशही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

भारतीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल लागला अन् काही मिनिटांतच फेसबुकवरुन बार्शीच्या ओंकार उर्फ महादेव धारूरकर यांच्या अभिनंदनाच्या पोस्ट फिरु लागल्या. आयएएस अधिकारी रमेश घोलप यांच्यानंतर UPSC परीक्षा उत्तीर्ण होणारे महादेव धारुरकर हे बार्शीचे दुसरे पुत्र आहेत. मध्यमवर्गीय कुटुंबातील महादेव यांच्या या गरुडझेपीने बार्शीकरांना आनंद झाला. दाणे गल्लीतील पानाच्या खुटावर महादेव यांच्या वडिलांचे रंगाचे दुकान आहे. त्यामुळे साहजिकच मध्यमवर्गीय कुटुंबातील अडीअडचणींचा सामना करत महादेव यांनी हे यश मिळवले.

दहावीमध्ये असताना महादेव धारुरकर याने अपंग प्रवर्गातून बोर्डा परीक्षेत महाराष्ट्रात पहिला क्रमांक मिळवला होता. त्यानंतर इंजिनिअरींग पूर्ण करुन त्यांनी UPSC परीक्षेची तयारी सुरु केली. आपले ध्येय, प्रचंड इच्छाशक्ती आणि कठोर मेहनतीने महादेव यांनी दोन वर्षातच देशात 857 वी रँक घेऊन हे यश संपादन केले आहे. भविष्यात आयएएस म्हणून काम करायला जास्त आवडेल, अशी इच्छा त्यांनी बोलून दाखवली. दरम्यान, भविष्यात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार असल्याचेही महादेव यांनी सांगितले.

मुलाचा फोन आल्यानंतर अतिशय आनंद झाला. काही क्षणासाठी तर काय बोलावे हेच कळत नव्हते. ज्या दिवशी भगवंत प्रकोटोत्सव होता, त्याच दिवशी ही आनंदाची बातमी समजली. त्यामुळे मला भगवंतच पावला. आमच्या कष्टाचे चीज झाले अशी भावनिक प्रतिक्रिया महादेवचे वडिल बाळकृष्ण धारुरकर यांनी व्यक्त केली.