fbpx

महाबळेश्वमध्ये थंडीच्या तीव्रतेत वाढ

mahabaleshwar Increase in cold intensity

सातारा : महाराष्ट्राचे नंदनवन महाबळेश्वर मधील थंडी दिवसेंदिवस वाढू लागली असून हवामान खात्याच्या नोंदी नुसार बुधवारी 13.6 व गुरुवारी येथील किमान तापमान 13.4 अंश डिग्री सेल्सिअस होते तर वेण्णा तलाव परिसरात ते आणखीन 4 -5 तपमानाने कमी होते. यामुळे नागरिक शेकोटी करताना दिसत असून स्थनिकांसह येथे फिरायला आलेले पर्यटक उबदार कपडे परिधान करून येथील गुलाबी थंड वातावरणाचा आनंद लुटताना दिसत आहेत.

दरम्यान, गेले तीन दिवसापासून येथे थंडी पडत असून तिची तीव्रता हळूहळू वाढू लागली आहे. या वाढत्या थंडीमुळे गेले दोन दिवस हे गिरी शिखर दवबिंदूंनी अक्षरशः नाहून निघाले होते. घरावरील पत्रे असो वा झाडे झुडपे सारे दवबिंदूंनी ओले चिंब झाले होते अर्थात वेण्णा तलाव परिसरही त्यास अपवाद नव्हता. दरम्यान, कालच्या पेक्षा एक डिग्रीने आज तापमान आणखीन खाली आल्याने वेण्णा तलावावरील पाण्यावर थंडीच्या वाफा मोठ्या प्रमाणात भल्या पहाटेपासून पहावयास मिळत होत्या. त्यामुळे वेण्णा तलाव परिसर गार तर होताच परंतु वेण्णा तलावाच्या पाण्यावर थंड वातावरणामुळे वाफा जमा झाल्याने परिसर पांढरा झाल्याचे दिसत होते.वेण्णा तलावाने जणू थंड वाफांची शालच पांघराल्याचे दिसत होते.

मात्र, कोठेही दवबिंदू गोठून हिमकण दृष्टीस पडले नाही. मात्र या परिसरात फिरणारे स्थानिक व पर्यटक या थंडीचा आनद मुग्धपणे लुटताना पहावयास मिळत होते. मागील आठवड्यातच ओखीमुळे येथील हवा थंड तर होतीच पण ते पावसाळीच बनले होते. त्यानंतर तापमानात थोडी वाढ झाली होती मात्र आत्ता पुन्हा येथील थंडीचा जोर वाढू लागला आहे. हवामान खात्याच्या नोंदी नुसार रविवारी येथील किमान तापमान 15.4, सोमवारी ते 14.6, मंगळवारी 14.6 , बुधवार येथील किमान तापमान 13.6 अंश डिग्री सेल्सियस होते. तर गुरुवारी ते 13.4 होते.