आ. मधुकर चव्हाण यांनी दुष्काळाचे राजकारण करू नये, शेतकऱ्यांना सरकारची सर्वतोपरी मदत – देशमुख

blank

तुळजापूर: तुळजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीकविमा कधीच जमा करण्यात आला आहे. मात्र जिल्हा बँकेवर सत्ता असणाऱ्या कॉंग्रेस -राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्याचे वाटप होऊ दिले नाही. आता दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात असताना आ मधुकर चव्हाण तालुक्यातील जनतेची दिशाभूल करत आहेत, अशी टीका भाजप नेते रोहन देशमुख यांनी केली आहे.

तुळजापूर तालुक्यामध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असून जनावरांसाठी चारा व पाणी पुरवण्यात सरकार कमी पडत आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांना सोयाबीनसाठी मंजूर करण्यात आलेल्या ८९ कोटी ५१ लाख रुपयांचे अनुदान तत्काळ वाटप करण्यात करावे. अधिग्रहण केलेले बोर आणि विहिरींचे अधिकार अद्याप उपजिल्हाधिकारी यांच्याकडे आहेत, मात्र मुख्यमंत्री आणि महसूलमंत्री अधिग्रहणाचे अधिकार तहसीलदार यांच्याकडे दिले असल्याची चुकीची माहिती देत असल्याचा आरोप आ मधुकर चव्हाण यांनी केला आहे.

मधुकर चव्हाण हे मागील २० वर्षांपासून उजनी धरणातून पाणी आणण्याचे आश्वासन देत आहेत, मात्र आजवर काहीही झाले नाही. भाजप सरकारच्या सत्ताकाळात या योजनेला मंजुरी देण्यात आली आहे दरम्यान, चव्हाण यांच्याकडून करण्यात आलेले आरोप चुकीचे असल्याचं भाजप नेते रोहन देशमुख यांनी म्हंटले आहे. तुळजापूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी बोर आणि विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले. जनावरांना चारा पुरवण्यासाठी सरकारकडून उपाययोजना करण्यात आली आहे. आज सरकारच्या नावाने खडे फोडणाऱ्या चव्हाण यांच्या पक्षाचीच १५ वर्षे सत्ता होती. आपल्या सत्ताकाळात कॉंग्रेसने जलसिंचनाचे प्रकल्प पूर्ण केले असते तर आज शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा नसता, अशी टीका देशमुख यांनी केली आहे.

जनावरांसाठी लोकमंगल फाउंडेशनच्या माध्यमातून चारा पुरवण्याचे काम केले जात आहे, तसेच दुष्काळी परिस्थितीमध्ये सरकार शेतकऱ्यांसोबत उभे असल्याचं रोहन देशमुख म्हणाले.