शिवसेनेचे राजकारण कुठे चालले –माधव भंडारी

madhav bhandari

टीम महाराष्ट्र देशा – शिवसेनाप्रमुख हयात असताना अनेक मोठे लोक त्यांना भेटण्यासाठी मातोश्रीवर जात असत. परंतु, हल्लीउद्धव ठाकरे ममता बॅनर्जीनां भेटण्यासाठी हॉटेलवर आणि शरद पवारंची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी जातात. तसेच गुजरातला जाऊन हार्दिक पटेलची भेट घेण्याचाही त्यांचा मानस आहे. त्यामुळे शिवसेनेचे राजकारण नेमके कुठे चालले आहे याचे आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचे मत भाजप प्रवक्ते माधव भंडारी यांनी व्यक्त केले.

राज्य सरकारला ३ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने संपर्क अभियानांतर्गत ते विदर्भ दौऱ्यावर असून आज, मंगळवारी नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी भंडारी म्हणाले की, ममता बॅनर्जी यांना पश्चिम बंगालमध्ये दुर्गोत्सवाच्या काळात मुस्लीमधार्जिणेपणा दाखवून दिला आहे. शरद पवार हिंदू दहशतवाद या शब्दाचे प्रणेते आहेत. तरगोधरा हत्याकांडातील आरोपींशी हार्दिक गळाभेट घेऊन सेल्फी काढतो. त्यामुळे स्वत: जाऊन त्यांची भेट घेणा-या शिवसेनेच्या सर्वोच्च नेत्यांनी विचार करण्याची गरज आहे की, त्यांच्या राजकारणाची नेमकी घसरण कशी सुरू आहे.

शिवसेनेकडून सरकारवर वारंवार होणा-या टीकेसंदर्भात बोलताना भंडारी म्हणाले की, राज्यात भाजपचे सरकार अस्तित्वात असून आम्ही स्वतःच्या बळावर सत्तेत आहोत. कुणाला आमची साथ नको असेल तर, त्यांनी खुशाल बाहेर पडावे सरकारचे काहीच वाकडे होणार नाही. आम्ही शिवसेनेच्या पाठिंब्यावर तसूभरही अवलंबून नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. याप्रसंगी भंडारी यांनी राज्य सरकारने गेल्या 3 वर्षात पायाभूत सुविधा, कृषी आणि उद्योग क्षेत्रात भरपूर काम केल्याचे सांगितले.

तसेच या तिन्ही क्षेत्रातील विकासाची त्यांनी माहिती दिली. त्यासोबतच जलयुक्त शिवार अतिशय उपयुक्त मोहिम असून याद्वारे सिंचनाचे उद्दीष्ट साध्य होऊन भूजल पातळीत वाढ होण्यास मदत झाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मराठवाड्यात जलयुक्त शिवारची सर्वाधिक कामे झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्याचप्रमाणे गेल्या तीन वर्षात उद्योग क्षेत्रात परकीय गुंतवणूक वाढली असून देशातील 2 लाख 10 हजार कोटी रुपयांच्या परकीय गुंतवणुकीपैकी राज्यात 1 लाख 29 हजार 12 कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक झाली आहे. तसेच लघु, मध्यम व सुक्ष्म उद्योगांमध्ये 70 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक झाल्याचे त्यांनी सांगितले. त्याशिवाय राज्यातील 142 शहरांमधील गरीबांना 2022 पर्यंत 20 लाख पक्की घरे देण्यासाठी सरकार वचनबध्द असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सुप्रियांची सेल्फी बारामतीचीराष्ट्रवादी काँग्रेसच्या खा. सुप्रिया सुळे यांनी रस्त्यावरील खड्डयांची सेल्फी काढून सोशल मिडीयात व्हायरल केली आहे. त्यासंदर्भात विचारले असता भंडारी म्हणाले की, सुप्रिया सुळेंची सेल्फी बारामती येथील आहे. त्यांचे वडील शरद पवार सलग 10 वर्ष केंद्रीय मंत्री होते. त्या स्वतः तिथल्या खासदार आहेत. तसेच राज्याचे सार्वजनिक बांधकाम खाते गेली 15 वर्ष राष्ट्रवादीकडे होते. तेव्हा हे खड्डे कसे पडले याचे उत्तर त्यांनाच द्यावे लागेल असा टोला भंडारी यांनी लगावला