माढा लोकसभा मतदारसंघात विजयसिंह मोहिते-पाटील डेंजर झोनमध्ये

माढा : (प्रवीण डोके ) लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळख जातो. आगामी लोकसभेला कुणाला उमेदवारी मिळणार हे अजूनही अस्पष्ट आहे. राष्ट्रवादीकडून विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांची उमेदवारी निश्चित मानली जात असली तरी प्रभाकर देशमुख यांनी हि जोरदार फिल्डिंग लावली आहे. त्यातच अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी या मतदारसंघात संपर्क वाढवला आहे. त्यामुळे त्यांच्या नावाची चर्चा सध्या जोरदार आहे. लोकसभेचे तिकीट कोणाला मिळणार अद्याप स्पष्ट झाले नसले तरी त्या दृष्टीने सर्वांनीच तयारी मात्र चालू केली आहे.

या लोकसभा मतदार संघात सोलापुर जिह्यातील करमाळा, माढा, माळशिरस, सांगोला हे चार तालुके आहेत. तसेच साताऱयातील माण आणि फलटण हे दोन तालुके आहेत. राष्ट्रवादीकडून विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांना तिकीट मिळाले तरी हि निवडणूक मोहिते-पाटलांना म्हणावी तितकी सोपी नाही.

माढा विधानसभा मतदारसंघ :
माढ्याचे असलेले सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्ष संजयमामा शिंदे यांचे आणि विजयसिंह मोहिते-पाटील यांचे वैर सगळ्या जिल्हयाला माहिती आहे. असे एकण्यात येत आहे की, काहीही झाल तरी लोकसभेला मोहिते-पाटील यांना निवडून येऊ द्यायचं नाही असा निश्चायचं संजयमामांनी केला आहे. त्यासाठीच काही दिवसांपूर्वी टेंभुर्णीत येथे संजयमामांच्या मळ्यात सांगोल्याचे शहाजीबापू, माळशिरसचे उत्तमराव, बार्शीचे राजाभाऊ, फलटणचे रणजीत नाईक निंबाळकर, म्हसवडचे जयकुमार गोरे, शेखर गोरे हे जमले होते. माढा लोकसभेची गणित यावेळी त्यांनी नव्याने मांडली असल्याचे समजते आहे.
त्यातच करकुंब साखर कारखान्याची गेल्या दोन वर्षांपासून शेतकऱ्यांची ऊसबिले थकलेली आहेत. २०१४ ची लोकसभा निवडणूक झाल्यापासून विजयसिंह मोहिते-पाटील जास्त या भागात फिरकलेले नाहीत. त्यामुळे माढ्यातील जनता विजयदादांवर नाराज असल्याचे चित्र पाहवयास मिळाले आहे.

करमाळा विधानसभा मतदारसंघ :
या मतदार संघात विजयदादांचे थोडे बहुत चलती असली तरी सध्या काही वर्षापूर्वी माजी राज्यमंत्री दिगंबर बागल यांना पाडण्यात विजयदादांचा हात होता, अशी चर्चाच्या सध्या होताना दिसत आहे. त्यामुळे करमाळ्याच्या रश्मी बागल किती साथ देणार यावर हे अवलंबून आहे. त्यातच करमाळा विधानसभा मतदार संघात माढ्यातील काही गावे गेली आहेत. तिथे हि संजयमामंचे वर्चस्व आहे. शिवसेनेचे आमदार नारायण आबा पाटील हे त्यांचे समर्थक मानले जात असले तरी ते निवडणुकीत किती साथ देतील यावर येथील गणिते ठरतील.

सांगोला विधानसभा मतदारसंघ :
माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनीही दादांच्या विरोधात कंबर कसली आहे. संजयमामाच्या टीमसोबत सध्या ते रमलेले पाहवयास मिळत आहेत. त्यामुळे हा हि मतदारसंघ दादांना म्हणावा तितका सोपा राहीलेला नाही.

माळशिरस विधानसभा मतदारसंघ :
या मतदार संघात दादांचे वर्चस्व आहे. परंतु याठिकाणी हि गेल्या अनेक वर्षांपासून दादांचा विरोधी गट कायम काम करत आहे. हा सर्व विरोधी गट लोकसभेला दादांना विरोध करणार आहे. त्यामुळे माळशिरस तालुक्यातील बरेच मतदान दादांच्या विरोधात जाणार आहे.

सातारा जिल्ह्यातील फलटण आणि माण विधानसभा मतदारसंघ :
या दोन्ही तालुक्यात विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते-पाटील फिरकत नसल्याने प्रचंड नाराजी आहे. त्यातच या दोन्ही तालुक्यात राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानीची चलती आहे. त्यामुळे राजू शेट्टी स्वभिमानीचा उमेदवार देण्याच्या तयारीत आहेत. फलटणचे रणजीत नाईक निंबाळकर यांनी ही जोरदार तयारी सुरु केल्याचे समजते आहे. या तालुक्यातूनच प्रभाकर देशमुख हे हि इच्छुक आहेत. त्यामुळे विजयदादांना लोकसभेचे तिकीट मिळाले तर देशमुख विजयदादांचे काम करणार कि नाही हे सुद्धा महत्वाचे आहे.

स्वभिमानीची भूमिका महत्वाची :
ऊस प्रश्नावर गेल्या अनेक वर्षांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटना या पट्ट्यात शेतकऱ्यांसाठी आंदोलने करत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्राबल्य हे फलटण, माण याबरोबरच माढा, माळशिरस, सांगोला आणि करमाळा या तालुक्यात वाढते राहिले आहे.

येणाऱ्या २०१९च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांना तिकीट मिळाले तरी हि निवडणूक त्यांना म्हणावी तेवढी सोपी नाही. माढा लोकसभा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असला तरी सुद्धा २०१४च्या लोकसभा निवडणुकीमध्ये स्वाभिमानीच्या सदाभाऊ खोत यांनी विजयसिंह मोहिते – पाटील यांना चांगलेच जेरीस आणले होते. सदाभाऊ खोत यांना दुसऱ्या नंबरची मते मिळाली होती.