fbpx

माढा लोकसभा : शरद पवारांनी निवडणूकीच्या आखाड्यात ठोकले शड्डू

टीम महाराष्ट्र देशा – माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हेच उभा राहणार असल्याचे आता निश्चित झाले आहे. त्याच पार्श्वभूमीवर पवारांनी आज मध लोकसभा मतदार संघामध्ये पहिली बैठक घेऊन निवडणुकीचे रणशिंग फुंकलं आहे.

पवारांनी सोलापुरमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीची पहिली संयुक्त बैठक बोलावली आहे. त्याच पार्श्वभूमीवर सोलापुरात शरद पवारांनी बैठक बोलावली. आजच्या या बैठकीत माढा लोकसभा मतदारसंघातून शरद पवारांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब होणार असल्याचे समजते आहे.

माढा लोकसभा मतदारसंघासाठी पवारांनी बोलावलेली ही पहिलीच बैठक आहे. या बैठकीत शरद पवार पुढील रणनीती ठरवणार हे निश्चित आहे. पवारांनी बैठक बोलावून कामाला सुरुवात केल्याने, पक्षातील अन्य नेत्यांनाही आता धावाधाव करावी लागणार आहे.

या बैठकीला राष्ट्रवादीचे माढ्याचे विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील, शेतकरी कामगार पक्षाचे आमदार गणपतराव देशमुख, पंढरपूरचे काँग्रेस आमदार भारत भालके यांच्यासह पदाधिकारी उपस्थित आहेत. एकंदरीत पवारांच्या या बैठकीला काँग्रेस आणि शेकापचे महत्त्वाचे आमदार उपस्थित असल्याने पवारांनी निवडणूक आखाड्यात शड्डू ठोकल्याचं चित्र आहे.

माढा लोकसभा मतदारसंघात सध्या विजयसिंह मोहिते पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आहेत. मात्र खुद्द विजयसिंह मोहिते पाटलांनीच पवारांना माढ्यातून लढण्याची विनंती केली. त्यामुळे निवडणूक न लढण्याची घोषणा केलेल्या शरद पवारांना पुन्हा निवडणुकीच्या रणांगणात उतरावं लागलं.