‘या’ उमेदवारामुळे वाढणार माढ्यातील उमेदवारांची डोकेदुखी ?

माढा : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठ्या राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. संभाजी ब्रिगेडने या सामाजिक संघटनेनेही आता राजकीय स्वरूप धारण केल्यानंतर लोकसभा निवडणूकीच्या मैदानात उडी घेतली आहे. संभाजी ब्रिगेडने येत्या लोकसभा निवडणुकांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. माढा, भिवंडी, जालना, उस्मानाबाद, रावेर, पुणे, सोलापूर मतदारसंघात संभाजी ब्रिगेड निवडणूक लढवणार आहे.

ज्या ठिकाणी संभाजी ब्रिगेडचे उमेदवार नसतील, त्या ठिकाणी काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना वगळता इतर उमेदवारांना सहकार्य करणार आहे. चार प्रस्थापित पक्षांनी आलटून पालटून सत्ता उपभोगली आहे, मात्र सर्वसामान्यांचे जीवन-मरणाचे प्रश्न त्यांनी कधीच सोडवले नाहीत, असा दावा संभाजी ब्रिगेडने केला. इतर ठिकाणी युती आघाडीचे उमेदवार सोडून इतर सेक्युलर उमेदवारांना पाठिंबा देणार असल्याचं संभाजी ब्रिगेडने औरंगाबादेत आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.

विशेष म्हणजे बहुचर्चित माढा लोकसभा मतदारसंघात संभाजी ब्रिगेडने विश्वंभर नारायण काशीद यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली. त्यामुळे प्रस्थापित उमेदवारांची डोकेदुखी वाढणार असल्याचे बोलले जात आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादीकडून संजय शिंदे तर भाजपकडून रणजितसिंह नाईक निंबाळकर मैदानात आहेत दरम्यान,काही दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी ब्रिगेडला सोबत घेण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, हाती काहीच न लागल्याने आता ब्रिगेड मैदानात उतरली आहे.