fbpx

माढ्यात अंतर्गत गटबाजीचे कारण पुढे करत, इच्छुकांना बाजूला करणे हा पवारांचा राजकीय डाव

टीम महाराष्ट्र देशा (प्रवीण डोके) – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देशातील भाजप विरोधी सर्व पक्षांना एकत्र करायला सुरुवात केली आहे. आगामी लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर, त्रिशंकू परिस्थिती उद्भवणार असल्याची खात्री पवारांना आहे. त्यामुळे राज्यासभेपेक्षा आपण लोकसभेत असण गरजेच आहे, अस पवारांना वाटत आहे.

लोकसभेत बसून भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी डावपेच आखता येतात, त्यामुळेच पवारांना लोकसभा निवडणूक लढवायची आहे. त्याचाच विचार करून राष्ट्रवादीच्या नेत्यांनी विजयसिंह मोहिते पाटील यांना गळ घातली आहे. पवार साहेब तुम्ही माढ्यातून निवडणूक लढवावी असे दादांना म्हण्यास सांगितले असल्याची  माहिती मिळत आहे. परंतु त्याची राजकीय झळ स्वतः विजयदादा यांनाच बसत आहे.

त्यामुळे दादा काहीसे नाराज असल्याचे चित्र निर्माण झाले होते. त्यात दादांचे समर्थक तर कमालीचे अस्वस्थ पाहायला मिळत होते. अनेकांनी तर शरद पवारांना सोशल मिडीयावर टार्गेट करायला देखील चालू केले होते. परंतु विजयदादांची नाराजी दुर करण्यासाठी स्वतः शरद पवारांनी पुढाकार घेत, विजयसिंह यांना  राज्यसभेवर तर रणजितसिंह यांना विधान परिषदेवर घेऊ असा शब्दच दिला असल्याची माहिती विश्वसनीय सूत्राकडून मिळाली आहे.

त्यांचा स्वतःचा बारामती मतदार संघ मुलगी सुप्रिया सुळे यांना सोडला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेला आणि सुरक्षित मतदार संघ पवारांसाठी माढा आहे, हे त्यांना ठाऊक असल्याने त्यांनी माढा लोकसभा मतदार संघ २००९ प्रमाणे पुन्हा निवडला आहे.

माढा लोकसभा मतदार संघामध्ये राष्ट्रवादीचे अनेक गट आहेत. माढा बबनदादा शिंदे, करमाळा श्यामालताई बागल, सांगोला दीपक आबा साळुंके, माळशिरस मोहिते पाटील तर फालटनला रामराजे नाईक निंबाळकर असे गट आहेत. या अंतर्गत गटबाजीचे कारण पुढे करत, पक्षातील सर्व इच्छुकांना बाजूला करणे हासुद्धा शरद पवारांचा राजकीय डाव असल्याचे बोलले जात आहे.

शरद पवार यांनी 2009 साली माढ्यातून निवडणूक लढवली होती आणि जिंकलेही होते. त्यावेळी शरद पवार यांना 5 लाख 30 हजार 596 मतं पडली होती, तर सुभाष देशमुख यांना 2 लाख 16 हजार 137 मते, आणि महादेव जानकर 98 हजार 946 मते पडली होती.

माढा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असून २००९ साली माजी केंद्रिय कृषी मंत्री शरद पवार निवडून आले होते तर २०१४ साली मोदी लाट असूनही विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांनी महायुतीचे उमेदवार व सध्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचा पराभव केलेला होता.