fbpx

संजय शिंदेना मताधिक्य मिळवून देणे बागलांना जाणार कठीण?

करमाळा- राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या माढा मतदारसंघाचा तिढा राष्ट्रवादीने सोडवून संजय शिंदेना उमेदवारी दिली परंतु करमाळ्यातून त्यांना मताधिक्य मिळवून द्यायला बागलांना मात्र अवघड जाणार असल्याची चर्चा सध्या जोरात सुरू आहे.

सध्याचे भाजप पुरस्कृत जि प अध्यक्ष संजय शिंदे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करून माढ्यातून उमेदवारी मिळविलेली असून आता त्यांना निवडून येण्यासाठी माढा आणि करमाळा तालुक्यातील मताधिक्य निर्णायक ठरणार आहे. संजय शिंदे लोकसभेची निवडणूक लढणार असल्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्या रश्मी बागल यांचा विधानसभेचा मार्ग मोकळा झाला असला तरी करमाळ्यातून संजय शिंदे यांना जास्त मताधिक्य मिळवून देणे सोपे जाणार नाही.

अकलूजचे मोहिते-पाटील भाजप मध्ये गेल्यामुळे तसेच करमाळा तालुक्यातील मोहिते-पाटील समर्थक संजय शिंदेना मदत करणे शक्य नाही तसेच करमाळ्यात सध्या शिवसेनेचे आमदार नारायण पाटील हेही आगामी विधानसभेच्या दृष्टीने तयारी करीत असल्यामुळे तेही युतीच्या उमेदवाराला जास्त मताधिक्य मिळेल याची खबरदारी घेत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे बागलांना मताधिक्य मिळवून देणे अवघड जाणार असल्याची चर्चा सुरू आहे.

नुकतीच रणजितसिंह मोहिते-पाटील आणि ‘प्रहार’ संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख अतुल खूपसे-पाटील यांची बंद दाराआड गुप्तगु झाली असुन, कदाचित ‘प्रहार’संघटना संजय शिंदेंच्या विरोधात उतरली तर संजय शिंदेंना हे महागात पडेल असे भाकित राजकीय विश्लेषक व्यक्त करीत आहेत.