fbpx

माढ्यात शिंदे विरुद्ध निंबाळकर, काय आहेत दोघांची विजयाची गणिते.. वाचा

विरेश आंधळकर : माढा लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीकडून संजय शिंदे तर भाजपकडून रणजितसिंह निंबाळकर लढत फायनल झाली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री फडणवीस यांनी हि लढाई प्रतिष्ठेची बनवली आहे. त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादीकडून विजय मिळवण्यासाठी साम – दाम – दंड – भेद वापरला जाणार हे निश्चित आहे. मात्र दोन्ही उमेदवारांच्या विजयाची गणिते नेमकी आहेत तरी काय ? असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे.

संजय शिंदे यांची राजकीय गणिते

मोहिते पाटलांचे कट्टर विरोधक म्हणून संजयमामा शिंदे यांना ओळखलं जातं. आजवर मोहिते पाटील आणि शिंदे हे दोघेही पवारांचे शिलेदार म्हणून ओळखले जात होते. जिल्ह्याच्या सत्ता संघर्षात दोन्ही गट आपल्या ताकदीने एकमेकांना चारीमुंड्या चीत करण्यासाठी काम करत आलेले आहेत. संजय शिंदे यांनी राष्ट्रवादीमध्ये राहून आपल्याला जिल्ह्याचा नेता होणे अशक्य असल्याचे ओळखत भाजपशी आघाडी केली होती. त्यामुळे अपक्ष असून देखील संजयमामा जि. प. अध्यक्ष बनले. मागील दोन वर्षात त्यांनी जिल्ह्यात बार्शीचे राजेंद्र राऊत, पंढरपूरमध्ये आ. प्रशांत परिचारक, समाधान अवताडे, माळशिरसचे उत्तम जानकर, माणमध्ये आ. जयकुमार गोरे, फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकर यांना एकत्रित करत आपली मोठ बांधली.

आता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे यांनी सहकाऱ्यांना विश्वासात न घेता थेट राष्ट्रवादीची उमेदवारी घेतली. किंबहुना मोहिते पाटील भाजपमध्ये गेल्याने शिंदे यांच्यापुढे राष्ट्रवादीशिवाय पर्याय राहिला नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील संजय मामा हेच पक्षाचे उमेदवार असतील हे निश्चित केल्याने त्यांच्यापुढे पर्याय राहिला नाही.

राष्ट्रवादीकडून संजय शिंदे तर भाजपकडून रणजितसिंह मोहिते पाटील लढाई होणार याची चर्चा माढ्यामध्ये जोरात होती. मात्र भाजपने मोहिते पाटील याचं वेगळ्या प्रकारे ‘पुनर्वसन’ करत फलटणच्या रणजितसिंह निंबाळकर यांना उमेदवारी दिली आहे. निंबाळकर यांना उमेदवारी मिळाल्याने सहाजिकच संजय शिंदेंनी उभारलेल्या समविचारी मित्रांच्या आघाडीत बिघाडी झाली. तर राजेंद्र राऊत, परिचारक, अवताडे यांनी मुख्यमंत्र्यांचा आदेश सर्वोच्च मानत भाजप उमेदवाराला ताकद देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे शिंदे यांची ताकद काही प्रमाणात कमी झाली आहे.

sanjay shinde

दुसरीकडे संजय मामा यांनी आता वाड्यावस्त्यावर जात ‘आपला माणूस’ ही प्रतिमा निर्माण करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये ते यशस्वी होणार का हे काळch ठरवेल. स्थानिक राष्ट्रवादी कॉंग्रेस नेत्यांनी मोहिते पाटलांच्या भाजप प्रवेशाने ‘सुंठी वाचून खोकला गेला’ म्हणत शिंदे यांना विजयी करण्यासाठी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे.

माढा मतदारसंघात सोलापूर जिल्ह्यातील चार तर सातारामधील दोन मतदारसंघ येतात. यामध्ये माढा, करमाळा आणि सांगोल्यामध्ये लीड मिळण्याची आशा शिंदे यांना आहे. तर मोहिते पाटलांच्या माळशिरसमध्ये किमान ५० टक्के मतदान मिळवणे शिंदे यांच्यासाठी गरजेच आहे. माण आणि फलटणमध्ये निंबाळकर यांच्यामुळे काही प्रमाणात फटका बसू शकतो. या दोन्ही ठिकाणी जास्तीत जास्त मतदान पदरात पाडण्याचा प्रयत्न संजय मामा यांना करावा लागणार आहे.

रणजितसिंह निंबाळकर यांची राजकीय गणिते

सत्ताधारी भाजपचे उमेदवार असणारे निंबाळकर यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सहकारमंत्री सुभाष देशमुख, खा विजयसिंह मोहिते पाटील, रणजितसिंह मोहिते पाटील यांचे पाठबळ मिळणार आहे.

मोहिते पाटील यांना जिल्ह्याच्या राजकारणात कमबॅक करण्यासाठी शिंदे यांचा पराभव होणे गरजेच आहे. रणजितसिंह मोहिते पाटील हे आपल्या पारंपारिक विरोधकाला चीतपट करण्यासाठी सर्वतोपरी जोर लावणार आहेत. त्यामुळे माळशिरस आणि मोहिते पाटील समर्थक आमदार नारायण पाटील यांचा मतदारसंघ करमाळ्यात निंबाळकर यांना चांगले मताधिक्य मिळू शकते.

cm devendra fadanvis

निंबाळकर यांचे होमग्राउंड असणाऱ्या फलटण आणि माण भागात सग्यासोयऱ्यांची साथ मिळण्याची शक्यता जास्त आहे. असे झाल्यास, फलटण, माण, माळशिरस, करमाळ्यात त्यांना आघाडी मिळण्याची आशा आहे.