fbpx

पवारांना पाडानंतर आता माढ्यात मामांना पाडा, कधीकाळचे मित्रच संजय शिंदेंना पडायला सज्ज

विरेश आंधळकर: माढा लोकसभा मतदारसंघात दररोज नवीन घडामोड घडत आहे. कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार संजय शिंदे यांचा पराभव करून शरद पवारांना धक्का देण्याची तयारी भाजपने चालवली आहे. यामध्ये कधीकाळी संजय शिंदे यांच्या समविचारी आघाडीत मित्र असणारेच आता ‘संजय मामांना पाडा’चा नारा देत आहेत.

sanjay shinde

राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी माढ्यातून लढण्याची घोषणा केल्यानंतर माढा आणि पवारांना पाडा’चा ट्रेंड सोशल मिडीयावर जोरात होता. त्यामुळे मतदारसंघात निर्माण झालेल्या पक्षांतर्गत बंडाळीची परिस्थितीत पवारांनी माघार घेत संजय शिंदे यांना उमेदवारी जाहीर केली. तर मोहिते पाटलांसारखे ताकदवर घराणे आज भाजपमधून राष्ट्रवादीचा उमेदवार पाडण्याची रणनीती आखत आहे. यामध्ये खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘वर्षा’वर बैठकांचा सपाटा लावला आहे. फडणवीस यांच्या मदतीला कधीकाळी शिंदे यांचे मित्र राहिलेले बार्शीचे राजेंद्र राऊत, भाजप उमेदवार रणजितसिंह निंबाळकर, आ प्रशांत परिचारक, शहाजीबापू पाटील आदी नेते धावून आले आहेत.

vaibhavraje jagtap
शंभूराजे जयवंत जगताप यांचा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश

माढा मतदारसंघात दररोज हि मंडळी कुठे ना कुठे सुरुंग लावण्याचा डाव खेळत आहे. त्यामुळे सुरुंगाच्या धमाक्याने निमगावपासून बारामतीपर्यंतच्या जमिनीला हादरे बसत आहेत. तर खा विजयसिंह मोहिते पाटील हे जुने हेवे दावे विसरून जेष्ठ नेत्यांना एकत्र करण्याचं राजकारण खेळत आहेत. माजी आ सुधाकरपंत परिचारक आणि मोहिते पाटील भेटीने याची झलक सर्वाना पहायला मिळाली.

cm devendra fadanvis

रणजितसिंह निंबाळकर यांना भाजपची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मोहिते पाटलांनी आपल्याला घाबरून माघार घेतल्याचं म्हणत शिंदे स्वत:चीचं पाठ थोपटत होते. निंबाळकर यांची उमेदवारी म्हणजे एका दगडात एक पक्षी नव्हे, तर संपूर्ण थवा उडवण्याची धूर्त खेळी भाजप नेत्यांनी खेळली आहे. हे ओळखण्यात तेल लावलेले पैलवान असणारे संजय शिंदे कुठेतरी कमी पडल्याचं दिसत आहे.

भाजपा महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासह, विजयसिंह मोहिते-पाटील, सुधाकरपंत परिचारक यांनी घेतली आ गणपतराव देशमुख यांची भेट.

दोस्त दोस्त ना रहा

राष्ट्रवादीचे उमेदवार आणि भाजपच्या पाठींब्यावर जि प अध्यक्ष असणारे संजय शिंदे यांनी कधीकाळी जिल्ह्यात समविचारी नेत्यांची मोट बांधली होती. या गटाने अनेकांना धक्के देखील दिले. संजय शिंदेंनी वेगवेगळ्या तालुक्यातील नेत्यांना एकत्र करण्याचे कारण केवळ मोहिते पाटील विरोध हेच होता. मात्र आपलाच डाव आपल्यावरच कसा उलटतो याचे मूर्तिमंत उदाहरण सध्या माढ्यात पहायला मिळत आहे.

chandrakant patil

या समविचारी आघाडीतील रणजितसिंह निंबाळकर हे भाजपचे उमेदवार आहेत, तर बार्शीचे राजेंद्र राऊत, आ प्रशांत परिचारक हे अनेकांना भाजप प्रवेश करायला लावून शिंदेंची कोंडी करत आहेत. शिंदेंच्या अचानक राष्ट्रवादी प्रवेशाने तोंड पोळलेले पालकमंत्री विजयकुमार देशमुख हे राऊत, परिचारक, पाटील यांच्या माध्यमातून संजय मामांना चीतपट करण्यासाठी रणनीती आखत आहेत.

देशमुख आणि पाटलांची माढ्याला रसद

माढ्याच्या लढाईत कुठेही कमी पडू नये, यासाठी सहकारमंत्री सुभाष बापू देशमुख आणि महसूलमंत्री चंद्रकांत दादा पाटील विशेष ‘रसद’ पुरवत आहेत, मोहिते पाटलांना वर्षावर पोहचवण्याची मोहीम सुभाष बापूंनीच फते केली, तर आता चंद्रकांत दादा हे माढ्यात तळ ठोकत इतरांना भाजपमध्ये प्रवेश देण्याची खेळी खेळत आहेत.

एकूणच काय तर पवारांना पाडानंतर आता माढ्यात संजय मामांना पाडाचा ट्रेंड जोरात सुरु आहे.