fbpx

माढा लोकसभा : वाचा कोणता उमेदवार, कोणता पक्ष?

माढा :(प्रवीण डोके) लोकसभेसाठी सध्या प्रत्येक पक्षाकडून जोरात मोर्चेबांधणी चालू आहे. उमेदवारीसाठी इच्छुकांची गर्दी वाढताना दिसत आहे. माढा लोकसभा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जातो. यावेळी राष्ट्रवादी पक्षाकडून उमेदवार कोण याबाबत मतदार संघात चर्चा चालू आहे. या ठिकाणी राष्ट्रवादी-कॉंग्रेस आणि भाजप या दोन पक्षात सरळ सरळ लढत असते.

लोकसभेच्या २०१४साली झालेल्या निवडणुकीत मोदी लाट असताना देखील महाआघाडीचे उमेदवार आणि विद्यमान कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचा पराभव करत अटीतटीच्या लढतीत विजयसिंह मोहिते-पाटील विजयी झाले होते. तेव्हापासून हा मतदारसंघ राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आणि सर्वात सुरक्षित मतदारसंघ असल्याचे बोलले जाते. राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि कॉंग्रेस पक्ष्यांचा या मतदार संघातील परिस्थितीचा घेतलेला हा आढावा.

राष्ट्रवादी
उमेदवार : विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, रणजितसिंह मोहिते-पाटील, निवृत्त सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख, अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार,
परिस्थिती : माढा लोकसभा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जातो. सध्या या मतदार संघात भाजपचे प्राबल्य वाढल्यामुळे राष्ट्रवादीची डोकदुखी वाढली आहे. त्यातच विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांच्यावर स्थानिक नेत्यांची असलेली नाराजी. यामुळे या मतदार संघातील उमेदवारीचा तिढा काही केल्या सुटतान दिसत नाही. यातील सस्पेन्स कायम असल्यामुळे कार्येकर्ते कमालीचे अस्वस्थ पाहवयास मिळत आहेत.

सध्या खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांनी पुन्हा तयारी चालवली आहे. अचानक तिकीट कापले गेले तर त्यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते-पाटील यांना उमेदवारी मिळण्यासाठी प्रयत्न चालू असल्याचे समजते आहे. तसेच निवृत्त सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांनी माढा, करमाळा, पंढरपूर, सांगोला, माळशिरस या भागात चांगलीच मोर्चे बांधणी सुरु केली आहे. पाणी, वीज, रस्ते, दुष्काळ असे विषय सोडवणाऱ्या उमेदवाराला लोकसभेत पाठवले जायला हवे, असे ते सांगताना दिसत आहेत. या सगळ्यात अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्याही नावाची चर्चा चालू असल्याने कार्येकर्ते संभ्रमात असलेले पहावयास मिळत आहे.

परंतु राष्ट्रवादीचे खासदार खासदार विजयसिंह मोहिते-पाटील किंवा त्यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते-पाटील यांनाच उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा सध्या चालू आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार काय निर्णय घेणार यावर आता सगळे अवलंबून असणार आहे.

भाजप
उमेदवार : सहकारमंत्री सुभाष देशमुख, जिल्हा परिषद अध्यक्ष संजय (मामा) शिंदे
परिस्थिती : काही दिवसांपासून माढा लोकसभा मतदार संघात सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी चांगलाच संपर्क वाढविला आहे. माढ्यातून भाजपचे संभाव्य उमेदवार म्हणून सहकारमंत्री देशमुख यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. काही दिवसांपूर्वी खुद्द सुभाष देशमुख यांनीच पक्ष जी जबाबदारी देईल ती स्वीकारणार असल्याचे म्हटले आहे . त्यातच काल झालेल्या मोदी यांच्या सभेनंतर दस्तरखुद्द मोदी यांनीच देशमुख यांना लोकसभा लढण्याचे आदेश दिले असल्याचे समजते आहे. त्यामुळे देशमुख हेच फिक्स उमेदवार असल्याची माहिती साधयतरी मिळते आहे.

त्यासोबतच जिल्हा परिषद अध्यक्ष संजय (मामा) शिंदे हे ही लोकसभेची तयारी करता असल्याची माहिती आतल्या गोटातून मिळाली आहे. काही दिवसांपूर्वी टेंभुर्णीत येथे संजयमामांच्या मळ्यात सांगोल्याचे शहाजीबापू, माळशिरसचे उत्तमराव, बार्शीचे राजाभाऊ, फलटणचे रणजीत नाईक निंबाळकर, म्हसवडचे जयकुमार गोरे, शेखर गोरे यांच्यासह काही महत्वाचे नेते जमले होते. या सर्वांनी माढा लोकसभेची गणित नव्याने मांडली असल्याचे समजते आहे. त्यामुळे संजय मामा शिंदे यांच्या भूमीकेकडे सुद्धा सर्वांचे लक्ष आहे.

या मतदार संघात दोन्ही नेत्यांचे चांगले वजन असल्यामुळे उमेदवार कोण असणार हे अद्याप स्पष्ट नसले तरी संभाव्य उमेदवार म्हणून सहकारमंत्री देशमुख यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे.

कॉंग्रेस आणि शिवसेना:

या मतदार संघात सध्यातरी या दोन्ही पक्षाकडून उमेदवारीच्या नावाची चर्चा दिसून येत नाही. परंतु शिवसेना-भाजप युती न झाल्यास शिवसेनेने पक्ष बांधणी करत उमेदवाराची तयारी चालवली असल्याचे कळते आहे. परंतु अद्याप नाव स्प्ष्ट झालेले नाही. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी-कॉंग्रेस आघाडीचा तिढा सुटल्याने इथे कॉंग्रेसचा कुठलाही उमेदवार चर्चेत नाही.

स्वाभिमानी शेतकरी संघटना
उमेदवार : रवीकांत तुपकर, अनिल पवार
परिस्थिती : या लोकसभा मतदारसंघामध्ये २०१४च्या लोकसभा निवडणूकीत राष्ट्रवादीचे उमेदवार विजयसिंह मोहिते-पाटील आणि स्वाभिमानी पक्षाचे व विद्यमान मंत्री सदाभाऊ खोत यांच्यात सरळ सरळ लढत झाली होती. यामध्ये स्वाभिमानीच्या सदाभाऊ खोत यांनी मोहिते-पाटील यांना चांगलेच जेरीस आणले होते. त्यामुळे माढा लोकसभा मतदारसंघ कुठल्याही परिस्थिती सोडायचा नाही असे खासदार राजू शेट्टी यांनी ठरवल्याचे चित्र पाहवयास मिळत आहे. स्वाभिमानीकडून सध्या रवीकांत तुपकर, अनिल पवार यांच्यासह एका सेवानिवृत्त शासकीय अधिकाऱयाच्या नावाचा उच्चार केला जात आहे.
ऊस प्रश्नावर गेल्या अनेक वर्षांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटना या पट्ट्यात शेतकऱ्यांसाठी आंदोलने करत आहे. त्यातच सातारा जिह्याचे फलटण, माण हे दोन तालुके या लोकसभा मतदार संघास जोडले गेले आहेत. त्यामुळे स्वाभिमानीचा उमेदवार यावेळी निवडून येईल असा विश्वास खासदार राजू शेट्टी यांना आहे.

त्यासोबतच धनगर नेते उत्तम जाणकर यांचेही नाव सध्या चर्चेत आहे. परंतु अध्याप ते कोणत्या पक्ष्याकडून निवडणूक लढवणार हे स्पष्ट नाही. त्यांचे कार्येकर्ते मात्र जोरदार कामाला लागलेले दिसत आहेत.

काय होऊ शकत?
सध्यातरी राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते-पाटील आणि सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्यात सरळ सरळ लढत होणार असल्याची चिन्हे आहेत.

विधानसभा मतदार संघ आणि बलाबल
या लोकसभा मतदार संघात सोलापुर जिह्यातील करमाळा, माढा, माळशिरस, सांगोला हे चार तालुके आहेत. तसेच साताऱयातील माण आणि फलटण हे दोन तालुके आहेत. यामध्ये शिवसेना एक, राष्ट्रवादी-कॉंग्रेस तीन, कॉंग्रेस एक, शेकाप एक असे विधानसभा आमदार बलाबल आहे.