माढा लोकसभा : राष्ट्रवादीकडून रणजितसिंह की विजयसिंह?

टीम महाराष्ट्र देशा : आगामी लोकसभा निवडणूकीसाठी माढा मतदारसंघातून मोर्चेबांधणीला सुरूवात झाली असून सर्व राजकीय पक्षांचे उमेदवारी अस्पष्ट असली तरी गावातील पारावरच्या गप्पा रंगात आलेल्या आहेत. सध्यातरी कुठल्याही पक्ष्याने अधिकृत उमेदवारी जाहीर केलेली नसली तरी माढा लोकसभेला आपल्याला उमेदवारी मिळेल ह्या हेतूने गाव भेटी तसेच मोर्चेबांधणीला सुरूवात केलेली आहे.

सध्या खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांनी पुन्हा तयारी चालवली आहे. अचानक तिकीट कापले गेले तर त्यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते-पाटील यांना उमेदवारी मिळण्यासाठी प्रयत्न चालू असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांच्यावर स्थानिक नेत्यांची असलेली नाराजी. यामुळे या मतदार संघातील उमेदवारीचा तिढा काही केल्या सुटताना दिसत नाही. यातील सस्पेन्स कायम असल्यामुळे कार्येकर्ते कमालीचे अस्वस्थ पाहवयास मिळत आहेत. परंतु राष्ट्रवादीचे खासदार विजयसिंह मोहिते-पाटील किंवा त्यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते-पाटील यांनाच उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा सध्या चालू आहे.

लोकसभेच्या २०१४साली झालेल्या निवडणुकीत मोदी लाट असताना देखील महाआघाडीचे उमेदवार आणि विद्यमान कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचा पराभव करत अटीतटीच्या लढतीत विजयसिंह मोहिते-पाटील विजयी झाले होते. तेव्हापासून हा मतदारसंघ राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आणि सर्वात सुरक्षित मतदारसंघ असल्याचे बोलले जाते.

तसेच निवृत्त सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांनी माढा, करमाळा, पंढरपूर, सांगोला, माळशिरस या भागात चांगलीच मोर्चे बांधणी सुरु केली आहे. पाणी, वीज, रस्ते, दुष्काळ असे विषय सोडवणाऱ्या उमेदवाराला लोकसभेत पाठवले जायला हवे, असे ते सांगताना दिसत आहेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार काय निर्णय घेणार यावर आता सगळे अवलंबून असणार आहे.