माढा लोकसभेसाठी मोदींनी दिले या उमेदवाराला आदेश?

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज सोलापूरमध्ये विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले. याच पार्श्वभूमीवर लोकसभेच्या दृष्टीने मोदींनी खाजगीत काही लोकसभा मतदार संघाची चर्चा केली असल्याचे कळते आहे. त्यात प्रामुख्याने सोलापुर आणि माढा लोकसभा मतदार संघाची चर्चा झाली आहे. यावेळी मोदींनी माढा लोकसभेसाठी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांना लोकसभा  लढण्याचे आदेशच दिले असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

लोकसभा मतदार संघाची चर्चा करताना यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सहकारमंत्री सुभाष देशमुख, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, खा.शरद बनसोडे उपस्थित होते. यावेळी सोलापूर लोकसभा मतदार संघाची चर्चा देखील झाली असल्याचे समजते आहे. मात्र या लोकसभा मतदार संघातून कोण उमेदवार असणार याबाबत नरेंद्र मोदींनी कुठलेही भाष्य केले नसल्याचे समजते आहे. मात्र माढा लोकसभेसाठी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या नावाला अनुकुलता दाखवत लोकसभा लढण्याचे आदेशच दिल्याचे समजते आहे.

माढा लोकसभा मतदार संघात लोकमंगलच्या माध्यमातून आणि त्यांचा स्वतःचा चांगल संपर्क आहे. त्यामुळे सुभाष देशमुख यांनाच उमेदवारी मिळाली पाहिजे अशी मागणी भाजप कार्यकर्त्यांची आहे. देशमुख हे नक्कीच निवडून येतील अशी खात्री भाजप कार्यकर्त्यांना आहे. त्या दृष्टीने सुभाष देशमुख हे सुद्धा लोकसभा मतदार संघात बैठका, गाठी-भेटी घेताना दिसत आहेत. त्यामुळेच भाजप कार्यकर्त्यांना विश्वास आहे कि सुभाष देशमुख हेच उमेदवार असतील. आज नरेंद्र मोदींनी आदेश दिले असल्याचे समजल्याने माढा लोकसभेसाठी सहकारमंत्री सुभाष देशमुख हेच सध्या तरी उमेदवार असल्याचे दिसत आहे.

माढा लोकसभा मतदार संघातून २००९ला शरद पवार यांनी निवडणूक लढवली होती. त्यावेळी देशमुखांनी यांनी शरद पवारांना चांगलीच लढत दिली होती. परंतु त्यांचे प्रयत्न कमी पडले. तोच अनुभव घेऊन देशमुख पुन्हा लोकसभेच्या तयारीला लागल्याचे चित्र आहे. २०१४ साली हि जागा स्वभिमानीला सुटली होती. त्यावेळी स्वाभिमानीचे सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादीच्या विजयसिंह मोहिते-पाटील यांना टक्कर दिली होती. माळशिरसने तालुक्याने तारल्यामुळे विजयसिंह मोहिते-पाटील पंचवीस हजारने विजयी झाले होते.

येणाऱ्या लोकसभेला हि जागा भाजपकडे राहाणार असल्याने इथे उमेदवार कोण याची चर्चा जोरदार चालू आहे. सध्या सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचा माढ्याला संपर्क वाढला आहे. त्यामुळे २००९ प्रमाणे २०१४ला पुन्हा सुभाष देशमुख हे चित्र पहावयास मिळत आहे. लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी सुभाष देशमुख यांच्याकडे देण्यात आली आहे. त्यांनी मतदारसंघ निहाय बैठका हि घेण्यास सुरुवात केली आहे.

सध्या सहकारमंत्री सुभाष देशमुख हे दक्षिण सोलापूरचे आमदार आहेत. माढा लोकसभा मतदार संघातून देशमुखांनी मैदानात उतरावे अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. कारण यापुर्वीच्या निवडणूकीचा त्यांना अनुभव आहे. लोकमंगलच्या माध्यमातून हि त्यांचा चांगला संपर्क आहे. तसेच त्यांच्या एवढा मातब्बर उमेदवार सध्या तरी भाजपकडे नाही. त्यामुळे पक्षासाठी माढा लोकसभेची बांधणी करत असतानाच उमेदवारीची माळ सुभाष देशमुख यांच्याच गळ्यात पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.