सोलापूर: भाजप सरकारला सत्तेतून पायउतार करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून परिवर्तनाचा निर्धार करत संपर्क यात्रेच आयोजन करण्यात आलं आहे. कोकण, मुंबई, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र पिंजून काढल्यानंतर ही यात्रा उद्या सोलापूर जिल्ह्यामध्ये येणार आहे. या निमित्ताने खा. मोहिते पाटलांचे होम ग्राउंड असलेल्या अकलूजमध्ये सभेचे आयोजन करण्यात आले आहे. याच सभेतून माढा लोकसभेसाठी इच्छुक उमेदवार जोरदार शक्तिप्रदर्शन करणार असल्याचं दिसत आहे.
सोबतच माढा लोकसभा उमेदवारीचा फैसला होणार असल्याची माहिती महाराष्ट्र देशाला मिळाली आहे. या मतदार संघातील विजयसिंह मोहिते पाटील आणि प्रभाकर देशमुख या दोन्ही समर्थकांचे लक्ष या परिवर्तन यात्रेकडे लागले आहे.
सोलापूर जिल्ह्याला राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बालेकिल्ला म्हणून म्हणून ओळखले जाते. मात्र २०१४ पासून या गडाला खिंडार पडताना दिसत आहे. पक्षामध्ये सुरु असलेल्या कुरघोडीच्या राजकारणामुळे कार्यकर्ते देखील संभ्रमात आहेत. यामध्ये मोहिते पाटील विरुद्ध इतर सर्व असा संघर्ष पहायला मिळत आहे.
यामुळेच आगामी लोकसभा निवडणुकीसाठी माढ्यात उमेदवारीवरून रस्सीखेच निर्माण झाली आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठींची डोकेदुखी वाढलेली आहे. मध्यंतरी माढ्यातून विजयसिंह मोहिते पाटील यांना डच्चू देत माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांना उमेदवारी निश्चित झाल्याच्या चर्चांना उधान आले होते. तर पक्ष पुन्हा एकदा विजय दादांनाच पसंती देईल असा आशावाद त्यांच्या समर्थकांना आहे. त्यामुळे पक्षाध्यक्ष शरद पवार आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार कोणाला पसंती देतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर थेट मोहिते पाटलांचे होम ग्राउंड अकलूजमध्ये निर्धार परिवर्तन यात्रेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, परिवर्तन यात्रेच्या निमित्ताने विजयसिंह मोहिते पाटील आणि प्रभाकर देशमुख हे जोरदार शक्तिप्रदर्शन करणार असल्याचं दिसत आहे.