माढा लोकसभेचा तिढा; दादा नको तर साहेब !

टीम महाराष्ट्र देशा – लोकसभेची निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे.मात्र माढा लोकसभा मतदार संघाचा तिढा काही केल्या सुटत नाही. विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील आणि माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख या दोघात लोकसभेची उमेदवारी कोणाला मिळणार हे अद्याप ही अस्पष्ट आहे.
माढा लोकसभेला विजयदादा नसतीलतर खुद्द शरद पवारांनीच २००९ प्रमाणे लोकसभेची निवडणूक लढवून पुनरावृत्ती करावी लागेल. तरच माढा लोकसभा मतदार संघ हा राष्ट्रावादीकेडे कायम राहील. अशी भावना सर्वसामन्य कार्यकर्ते आता बोलून दाखवू लागले आहेत.

विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांनी अद्याप कोणतीही भूमिका जाहीर केलेली नाही. परंतु विजयदादा ऐवजी रणजीतदादांना लोकसभेची उमेदवारी मिळावी असे मोहिते पाटील गटाला वाटते आहे. परंतु रणजीतदादांचे नेतृत्व इतर गात स्वीकारणार नाहीत, अशी परिस्थिती सध्या आहे. त्यामुळे शरद पवारांनीच २००९ प्रमाणे लोकसभेची निवडणूक लढवून पुनरावृत्ती करावी, अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे.

माढा लोकसभा मतदार संघामध्ये राष्ट्रवादीचे अनेक गट आहेत. माढा बबनदादा शिंदे, करमाळा श्यामालताई बागल, सांगोला दीपक आबा साळुंके, माळशिरस मोहिते पाटील तर फालटनला रामराजे नाईक निंबाळकर असे गट आहेत.

प्रत्येक तालुक्यातील गट हा स्वतंत्र असून कोणत्याच गटाचे एकमेकांशी पटताना पाहवयास मिळत नाही. त्यात राष्ट्रवादीच्या सर्व गटांचे समर्थन विजयदादांना आहे, असे ही नाही. परंतु या सर्व गटांची मोळ बांधण्याची ताकद फक्त अनुभवी विजयदादा मध्ये आहे. सर्वांना एकत्र करत हा मतदार संघ पुन्हा राष्ट्रवादीकडे ठेवण्याची क्षमता विजयसिंह मोहिते पाटील यांच्या मध्ये असल्याचे राजकीय जाणकार सांगत आहेत.