मदन पाटील स्मारक समाधी कामात एक कोटी रुपयांचा घोटाळा-मनसे

nitin shinde mns

सांगली : सांगली महापालिकेतील कॉंग्रेसचे नेते माजी मंत्री मदन पाटील यांच्या स्मारक व समाधीस्थळ येथील कामात त्यांच्याच जवळच्यांनी सुमारे एक कोटी रूपयांचा घोटाळा केला आहे. अगदी मदन पाटील यांच्या पुतळ्यातही या बगलबच्च्यांनी टक्केवारी घेतली आहे, असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते माजी आमदार नितीन शिंदे यांनी केला. ज्या नेत्याच्या नावे कॉंग्रेसचे सर्वसामान्य कार्यकर्ते महापालिकेत पदाधिकारी अथवा ठेकेदार झाले, त्यांनीच मदन पाटील यांच्या स्मारक व समाधीस्थळी केलेल्या कामात चांगलाच ‘हात’ मारला आहे. महापालिकेतील एका पदाधिका-याच्या निकृष्ट व भ्रष्ट कारभारामुळे मदन पाटील यांच्या पुतळ्याची ओळखच हरवली आहे. त्यामुळे स्मारक व समाधीस्थळी झालेल्या कामाची संपूर्ण कारभाराची सखोल चौकशी करून संबंधितांवर कडक कारवाई करावी, अशी मागणीही नितीन शिंदे यांनी केली.

madan pati

 महापालिकेत रस्ते, गटारी, ड्रेनेज, पाणी, घरकुल, औषध व स्मशानभूमी आदी विविध कामात ठेकेदारीपासून सर्वच कारभारात प्रचंड भ्रष्टाचार सुरू आहे. मात्र ज्यांनी राजकारणात मोठे केले, त्या मदन पाटील यांच्या स्मारक व समाधीस्थळाही या बगलबच्चे लुटारूंनी सोडले नाही. उलट हे लुटीचे दुकान म्हणूनच या सर्वांनी या कामांकडे पाहिले. या दोन्हीही कामांवर प्रत्येकी एक- एक कोटी रूपयांचा खर्च दाखविला गेला. वास्तविक, या कामांचा दर्जा व त्याची किंमत पाहिली, तर किमान एक कोटी रूपयांची लूट महापालिकेतील पदाधिका-यांनी केली आहे. मदन पाटील यांच्या पुतळा त्यांच्यासारखा झालाच नाही व तो तसा दिसतही नाही, याची सर्वांनाच कल्पना आहे. मात्र त्याबाबत कोणीही तोंड उघडले नाही. पण कॉंग्रेसचेच ज्येष्ठ नगरसेवक सुरेश आवटी यांनी महापालिका सभेत हे प्रकरण उघड केले. या पुतळ्यावर १६ लाख रूपयांचा खर्च केला आहे, तोही संशयास्पदच आहे. या दोन्हीही कामांची महापालिका आयुक्त रविंद्र खेबूडकर यांनी सखोल चौकशी करावी. त्यातील दोषी पदाधिकारी अथवा सदस्यावर कडक कारवाई करावी. संबंधित शिल्पकाराकडून योग्य त्या पध्दतीने मदन पाटील यांच्या पुतळ्यात दुरूस्ती करून घ्यावी. याशिवाय संबंधित या दोन्ही कामावरील अनावश्यक खर्च टाळून त्यातून महापालिका क्षेत्रात भाजी मंडई उभारून त्याला मदन पाटील यांचे नाव द्यावे, अशी मागणीही नितीन शिंदे यांनी केली.