भिडे- एकबोटे यांना अटक न करणे म्हणजे लोकशाहीची थट्टाच – दलित महासंघ

MILIND EKBOTE NAD BHIDE GURUJI

सांगली : ‘भीमा- कोरेगाव’प्रकरणी श्री शिव प्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे व मिलिंद एकबोटे यांना अद्यापही अटक झालेली नाही. ही एकप्रकारे लोकशाहीची थट्टाच आहे. या दोघांनाही तातडीने अटक करावी, या मागणीसाठी दलित महासंघाच्यावतीने. १३ फेब्रुवारी रोजी सांगली येथे भारत बचाव परिषदेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती दलित महासंघाचे नेते प्रा. मच्छिंद्र सकटे यांनी दिली.

या सरकारचे संपूर्ण कामकाज संविधानविरोधी आहे. त्यातूनच प्राथमिक शाळा पाडण्यात येत आहेत, तर महिलांवर अत्याचार केले जात आहेत. लोकसभा- विधानसभा निवडणुका जवळ आल्याने जाणीवपूर्वक दंगली घडविल्या जात आहेत.’भीमा- कोरेगाव’ येथे झालेली दंगल हाही त्याचाच एक भाग आहे. या घटनेचा दलित महासंघाच्यावतीने तीव्र निषेध करण्यात आला आहे.

दंगल घडवणाऱ्या संभाजी भिडे व मिलिंद एकबोटे यांना तातडीने अटक करावी व या सरकारच्या जुलमी कारभारातून या देशाला वाचवावे, या हेतूने १३ फेब्रुवारी रोजी विष्णुदास भावे नाट्यगृहात भारत बचाव परिषदेचे आयोजन केले आहे. या परिषदेत माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे- पाटील, प्रवीण गायकवाड, डॉ. भारत पाटणकर व डॉ. बाबुराव गुरव आदी मार्गदर्शन करणार असल्याचेही प्रा. मच्छिंद्र सकटे यांनी सांगितले.