म. फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्याची राज्य सरकारची केंद्राकडे शिफारस

टीम महाराष्ट्र देशा – सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांचा मरणोत्तर ‘भारतरत्न’ पुरस्कार देऊन सन्मान करावा, अशी शिफारस राज्य सरकारने केंद्राकडे केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विषयीची माहिती दिली आहे.

पुण्यातील बुधवार पेठेतील भिडे वाड्यामध्ये महात्मा फुले यांनी १८४८ साली मुलींची शाळा सुरु केली. सावित्रीबाई फुले त्या शाळेतील पहिल्या शिक्षिका होत्या. या दोघांनी तत्कालिन सामाजिक व्यवस्थेला झुगारुन हे क्रांतीकारक पाऊल उचलले. स्त्री-पुरुष समानतेचा पाया त्यांनी घातला होता.

दरम्यान,महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्याची मागणी यापूर्वीही करण्यात आली होती. महात्मा जोतिबा फुले यांना मरणोत्तर भारतरत्न हा सर्वोच्च नागरी किताब देऊन त्यांच्याप्रति आदर व्यक्त करण्यात यावा, यासाठी केंद्र सरकारला शिफारस करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१६ मध्ये विधानसभेत दिले होते.

आर्थिक आधारावर आरक्षण देण्याची मायावती यांची मागणी