द्रमुक प्रमुख एम. करूणानिधी काळाच्या पडद्याआड

चेन्नई – तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि द्रमुकचे अध्यक्ष एम. करुणानिधी यांचे चेन्नईतील कावेरी रुग्णालयात आज सायंकाळी ६ वाजून १० मिनिटांनी निधन झाले. ते ९४ वर्षांचे होते. करुणानिधी यांच्या निधनाने तामिळनाडूच्या राजकारणातील एक मातब्बर नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर चेन्नईतील कावेरी रुग्णालयात उपचार सुरू होते. करुणानिधी यांनी पाचवेळा तामिळनाडूचे मुख्यमंत्रीपद भूषवले होते. त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आल्यापासून रूग्णालयाबाहेर त्यांचे चाहते आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली होती.

करूणानिधी यांना मुत्रपींडाचाही त्रास होता. शनिवारपासून कावेरी हॉस्पिटलमधील अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते.तामिळ संस्कृती आणि द्रविडी अभिमान यावर द्रमुकची पायाभरणी झाली. पण हिंदीविरोधी आंदोलनाने पक्षाला राष्ट्रीय राजकारणात ओळख दिली. केवळ सामाजिक कार्यामध्ये समाधान मानणाऱ्या पक्षाला १९५६च्या सुमारास लोकाग्रहास्तव निवडणुकीच्या राजकारणामध्ये उतरावे लागले.

१९६७ मध्ये पक्ष बहुमताने सत्तेवर निवडून आला आणि दोन वर्षातच करुणानिधी मुख्यमंत्री झाले. त्यांच्या नेतृत्वाखालील द्रमुकच्या सरकारने कमाल जमीन धारणा कायदा, विद्यार्थ्यांसाठी माध्यान्य भोजनाची योजना भक्कम करणे असे काही महत्त्वाचे निर्णय घेऊन तामिळनाडूच्या सामाजिक परिस्थितीत सुधारणा करण्याचा यशस्वी प्रयत्न केला.