नारायण राणे आणि मुख्यमंत्र्यांची गुफ्तगू; मुख्यमंत्री अमित शहांच्या भेटीला

टीम महाराष्ट्र देशा: महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली आहे. या चर्चेत नक्की काय झाल हे जरी समोर आलं नसलं तरी आगामी विधानपरिषद पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही झाल्याची माहिती आहे.

राणेंनी काँग्रेसला रामराम केल्यानंतर विधानपरिषदेच्या रिक्त झालेल्या जागेसाठी निवडणूक होणार आहे. येत्या ७ डिसेंबरला ही निवडणूक होणार आहे. भाजपचे 122, शिवसेनेचे 63 , काँग्रेसचे 42, राष्ट्रवादी 41 तर इतर पक्षाचे 20 आमदार आहेत. भाजप आणि इतर पक्ष एकत्र आले तरी जिंकण्यासाठी लागणारा 145चा आकडा गाठता येत नाही.

त्यामुळे या पोटनिवडणुकीबाबत आपण पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करू असं नारायण राणेंनी स्पष्ट केलं आहे.

मुख्यमंत्र्यांनी घेतली अमित शहांची भेट

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अहमदाबादमध्ये भाजपाध्यक्ष अमित शाह यांची भेट घेतली. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. अंतिम निर्णयासाठी 28 नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि मुख्यमंत्री यांची बैठक होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

दरम्यान या बैठकीत केवळ गुजरात निवडणुकीवरच चर्चा झाल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. राज्यातील कार्यकर्त्यांच्या भावना अमित शाहांपर्यंत पोहोचवल्या. गुजरातमध्ये प्रचारासाठी येणार आहे, असं त्यांनी बैठकीनंतर सांगितलं.