मुंबई-चेन्नई सामन्यात झाली विक्रमांची बरसात

टीम महाराष्ट्र देशा : चेन्नई येथील चेपॉकच्या मैदानात धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या चेन्नईला पराभूत करत मुंबईने बाराव्या हंगामातील आयपीएल स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. या विजयासह मुंबई इंडियन्सने अनेक विक्रम आपल्या नावे नोंदवले आहेत. मुंबईने सातत्याने चारवेळा धोनीच्या संघाला पराभूत करण्याचा पराक्रम केला आहे.

मुंबई इंडियन्सनं मंगळवारी पहिल्या क्वॉलिफायर सामन्यात चेन्नई सुपर किंग्सला सहा विकेट्सनी पराभूत करत फायनलमध्ये धडक मारली आहे. मुंबई पाचव्यांदा फायनल प्रवेश केला आहे.

आपल्या घरच्या मैदानावर चेन्नईवर विजय मिळवणं मुंबईसाठी सोपी गोष्ट नव्हती. २१  सामन्यात चेन्नईनं १८  सामन्यात विजय मिळवला आहे तर, ३ सामन्यात पराभव मिळाला आहे. तीनही वेळा मुंबईनं चेन्नईला पराभूत केलं आहे.

चेन्नईच्या विरोधात सलग ४ सामन्यात विजय मिळवत मुंबईनं एक रेकॉर्ड केला आहे. याआधी कोणत्याही संघाला ही कमाल करता आलेली नाही. मुंबईनं मागच्या हंगामातही चेन्नईला पराभूत केलं होतं. तर, या हंगामात एकूण २ वेळा लीग स्टेजमध्ये समोरासमोर आले होते, त्या दोन्ही सामन्यात मुंबईनं चेन्नईला भुईसपाट केलं

या सामन्यात मॅन ऑफ द मॅच पटकावणाऱ्या सुर्यकुमार यादवने विशेष कामगिरी बजावली. त्याच्या संयमी फलंदाजीमुळे मुंबईला चेन्नईचा पराभव करता आला. या सामन्यात मुंबईचे खेळाडू चमकले असले तरी चेन्नई संघातून खेळणाऱ्या इम्रान ताहिरने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्याने ट्वेंटी-२०क्रिकेटमध्ये ३०० बळी घेण्याचा विक्रम केला आहे. हा विक्रम करणारा तो जगातील सातवा गोलंदाज ठरला आहे.