दोन दिवसांच्या अतिवृष्टीने जिल्हा परिषदेंतर्गत २४५ कोटींचे नुकसान; मात्र केवळ ८. ९० कोटींचीच मिळणार नुकसान भरपाई

औरंगाबाद : जिल्ह्यात ७ व ८ सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्हा परिषद अंतर्गत मालमत्तांचे अतोनात नुकसान झाले आहे. जिल्हा परिषदेने केलेल्या पाहणीत हे नुकसान एकूण २४५ कोटींच्या घरात गेले असल्याचे समोर आले आहे. मात्र राष्ट्रीय आपत्ती निवारण समितीच्या तत्वानुसार केवळ ८. ९० कोटींचीच नुकसान भरपाई विचारात घेतली जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटणे यांनी दिली.

या दोन दिवसात सर्वत्र मोठा पाऊस झाला. या पावसामुळे जिल्हा परिषदांच्या अनेक मालमत्ता नष्ट झाल्या तर अनेक मालमत्तांचे मोठे नुकसान झाल्याचे प्राथमिक पाहणीत समोर आले आहे. गुरुवारी सीईओ गटणे यांनी या नुकसानीची माहिती प्रसार माध्यमांना दिली. गटणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, यामध्ये पाणीपुरवठा, ग्रामपंचायत, बांधकाम, आरोग्य, सिंचन अशा विभागांचे मिळून २४५ कोटींचे नुकसान झाले आहे.

नुकसान झालेल्या मालमत्तांमध्ये पाणी पुरवठा विभागांतर्गत कन्नड तालुक्यातील ग्रामपंचायत साई गव्हाण, नागद, देभेगाव व करंजखेडा अंतर्गत ४ योजनांचे १७.५० लक्ष रुपयांचे नुकसान झाले. ग्रामपंचायत विभागांतर्गत १४४ ग्रामपंचायत इमारतींचे १७.२८ कोटींचे तर इतर ९८ इमारतींचे ११.७६ कोटी असे एकूण २४२ इमारतींचे २९.०४ कोटींचे नुकसान झाले आहे. बांधकाम विभागालाही या पावसामुळे मोठी झळ बसली आहे. विभागाच्या जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील ODR आणि ग्रामरस्ते यांचे ६६५५ किलोमीटरपैकी ६४३ किलोमीटर रस्ते खराब झाले. या रस्त्यांचे एकूण २११.४७ कोटी रुपयांचे नुकसान झाले असून, त्यापैकी तातडीने रस्ते दुरुस्तीसाठी ९. ६४ कोटीं रुपये आवश्यक आहे.

याखेरीज आरोग्य विभागालाही या पावसाचा सामना करावा लागला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ६ एकूण इमारतींना या पावसाने नुकसान केले असून, एकूण १२.५ लक्ष रकमेचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. सिंचन विभागांतर्गत जिल्ह्यातील एकूण 20 बंधारे नुकसान ग्रस्त झाले असून, नुकसानी ची प्राथमिक आकडेवारी ४१९ लक्ष असल्याचे सीईओ गटणे यांनी सांगितले.

जिल्हा परिषदेने केलेल्या पाहणीत हे नुकसान एकूण २४५ कोटींच्या घरात गेले आहे. मात्र राष्ट्रीय आपत्ती निवारण समितीच्या तत्वानुसार केवळ ८. ९० कोटींचीच नुकसान भरपाई विचारात घेतली जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटणे यांनी यावेळी दिली. दोन दिवस झालेल्या या पावसामुळे ग्रामीण जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्हा परिषदेकडून आवश्यक ती उपाययोजना सुरु करण्यात आली असल्याचे यावेळी सीईओ गटणे यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या