शेती-सहकाराच्या परिवर्तनासाठी प्रयत्नशील असणारा नेता गमावला – देवेंद्र फडणवीस

devedra fadnvis and pandurang fundkar

मुंबई, दि. ३१ : राज्याचे कृषिमंत्री पांडुरंग ऊर्फ भाऊसाहेब फुंडकर यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांच्या निधनाने कृषी, सहकार आणि संबंधित विषयांची सखोल जाण असणारा आणि या क्षेत्रात सकारात्मक परिवर्तनासाठी प्रयत्नशील असणारा नेता राज्याने गमावला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात, श्री. फुंडकर यांच्या निधनामुळे मी एक ज्येष्ठ सहकारी आणि मार्गदर्शकाला मुकलो आहे. शेती आणि सहकारासह संबंधित विविध विषयांची त्यांना सखोल जाण होती. विरोधी पक्षनेते, आमदार, संसद सदस्य, भाजपचे प्रदेशाध्यक्ष अशा अनेक जबाबदाऱ्या त्यांनी भक्कमपणे सांभाळताना पक्षाला नव्या उंचीवर नेण्यात मोठे योगदान दिले. सध्या राज्यात शाश्वत शेती विकासासाठी करण्यात येणाऱ्या प्रयत्नांमध्ये त्यांचा कृषिमंत्री म्हणून मोठा पुढाकार होता. उन्नत शेती-समृद्ध शेतकरी योजना, पीक विमा योजना, गटशेती, एकत्रित क्रॉपसॅप योजना, महावेध प्रकल्प, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, कृषी व अन्न प्रक्रिया उद्योग अशा अनेक महत्त्वपूर्ण उपक्रम-योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी त्यांचे कसोशीने प्रयत्न होते. कीटकनाशकांच्या को-मार्केटिंगवर बंदी आणतानाच कीटकनाशके आणि बीटी बियाण्यांचे परराज्यात उत्पादन करून महाराष्ट्रात ते विविध कंपन्यांच्या नावाने विक्री करण्यासाठी (को-मार्केटिंग) परवाना न देण्याबाबतचा महत्त्वपूर्ण निर्णय त्यांनी घेतला होता.

तत्पूर्वी, मुख्यमंत्र्यांनी सकाळी सोमय्या हॉस्पिटलमध्ये जाऊन श्री. फुंडकर यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले आणि त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले.