खाजगी क्लासेसकडून विद्यार्थ्यांची लूट 

संदीप कापडे. पुणे : विद्येचे माहेर घर असलेल्या पुणे शहरात खाजगी क्लासेस विद्यार्थ्यांची लूट होत असल्याचं वास्तव समोर येतं आहे . शिक्षणक्षेत्रातअग्रेसर असल्यामुळे मोठ्या प्रमाणात विद्यार्थी शिक्षणासाठी पुण्यात येतात मात्र याठिकाणी खाजगी क्लासेस घेणाऱ्या संस्थांकडून अक्षरशः विद्यार्थ्यांची लूट सुरू आहे.

नुकताच 10 वी आणि 12 वी चा निकाल जाहीर झाला आहे. विद्यार्थी विद्यालया पेक्षा चांगले शिकवणी वर्ग मिळावे म्हणून प्रयत्नात आहेत.  विज्ञान , वाणिज्य शाखेत प्रवेश मिळावा म्हणून विद्यार्थी प्रयत्न करताना पहायला मिळत आहेत. महाराष्ट्रातभर सर्व ठिकाणी शिकवणीवर्गा कडून होणारी आर्थिक लूट समोर आली आहे. विज्ञान शाखेच्या शिकवणी वर्गाची एक ते दीड लाख पर्यंत फी आहे. त्यामुळे सामान्य विद्यार्थ्यांचा शिकावे तरी कसे  ? हा प्रश्न उपस्थित होत आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेणाऱ्या क्लासेसकडून सुद्धा 1 ते 2 लाख फी घेऊन प्रवेश दिला जात आहे.या शिक्षणाच्या बाजारीकरणाबाबत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी लक्ष घालण्याची मागणी  पालक मंडळींमध्ये आहे.  कर चोरीसाठी  काही नामांकित शिकवणी वर्ग दीड लाख शुल्क आकारून  पावती फक्त 3 ते 5 हजारांची देतात.  विद्यार्थी घडवण्याच्या ठिकाणीच असा गैरप्रकार घडत आहे . शिकवणी वर्गाच्या अवाजवी शूल्कामुळे सर्वसामान्य विद्यार्थी भरडला जातोय हेच वास्तव आहे.

यासंदर्भात महाराष्ट्र देशाने पालक तसेच विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या त्यांनी देखील विद्यार्थी तसेच पालकांची लूट होत असल्याच्या गोष्टीला दुजोरा दिला आहे . त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांची लुट करणाऱ्या क्लासेसवर कारवाईची मागणी देखील केली आहे.

माणसाने अन्न ,वस्त्र ,निवारा ह्या तीन गरजा आत्मसात तर केल्याच पण आता शिक्षण सुद्धा मुख्य गरज आहे. एकीकडे शासन सर्व शिक्षण अभियान राबवते तर दुसरीकडे जादा शैक्षणिक शुल्क आकारते. विज्ञान , वाणिज्य , कला या सर्व शाखेत समान शुल्क आकारण्यात यावे. तसेच शहरात महाविद्यालयातिल शिक्षकच शिकवणी वर्ग घेतात. जर शाळा महाविद्यालयात शिक्षण चांगले मिळाले तर विद्यार्थ्यांना शिकवणी वर्ग लावण्याची गरज राहणार नाही. शैक्षणिक शूल्कात पारदर्शकता असावी.
– भीमराव दंदी – पालक

खाजगी शिकवणी वर्गाचा धंदा बंद व्हायला हवा.विद्यार्थ्यांनी नियमित कॉलेज कराव.
शिकवणी वर्गावर अवलंबून राहू नये. ग्रामीण भागत शिकवणी वर्ग नसून सुद्धा विद्यार्थी अव्वल असतात. तसेच शासनाने ठराविक फी आकारणीसाठी समान धोरण आखाव. विद्यार्थ्यांनी मोठ्या जाहिरातीला बळी पडू नये.
– किरण साळी – युवसेना प्रमुख, पुणे शहर

सामान्य गरीब विद्यार्थ्यांची शिकवणी वर्गाकडून होणारी लूट रोखण्यासाठी शासनाने कायदा करावा. सध्याची शिक्षण पद्धति कमकुवत असल्यामुळे विद्यार्थ्यांना खाजगी वर्गाची गरज भासते. त्यामुळे आताची शिक्षण पद्धत सक्षम व्हायला हवी. शासनाने लवकरात लवकर खाजगी शिकवणी शुल्क आकारणीवर निर्बंध लावावे. कारण यात फक्त नुकसान गरीब मुलांचेच होते.
सोमनाथ निर्मळ, राज्य उपाध्यक्ष SFI

पुणे हे शिक्षणाचे माहेरघर आहे म्हणूनच संपूर्ण राज्यातूनच नव्हे तर देशभरातून मोठ्या संख्येने विद्यार्थी या ठिकाणी येतात. परंतु या शहरात अशा आलेल्या विद्यार्थी आणि पालकांची दिशाभूल करून त्यांच्याकडून पैसे उकळण्याचं काम मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. खाजगी शिकवण्या व खाजगी महाविद्यालयांच्या भरमसाठ वाढलेल्या फि याचं उदाहरण आहे. म्हणून पालकांना आणि विद्यार्थ्यांना आवाहन करतो की त्यांनी खाजगी शिकवण्याच्या भूलथापांना बळी पडू नये व स्वतः चे आर्थिक शोषण थांबवावे.  –प्रतीक दामा, अध्यक्ष, अभाविप पुणे विद्यापीठ

शासनाने खाजगी शिकवणी वर्ग शुल्क वाढीवर लवकर तोडगा काढावा. नाहीतर ऑगस्ट नंतर शासनाच्या विरोधात आम्ही आंदोलन  करू. आम्ही आमची भूमिका स्पष्ट केली. तसेच खाजगी अभ्यासीका कडून होणारी लूट थांबवावी. मुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष देऊन सामान्य गरीब विद्यार्थ्यांना न्याय द्यावा. नाहीतर मनवीसे आक्रमक होईल – कल्पेश यादव, पुणे शहर अध्यक्ष मनविसे.