fbpx

भिडे -एकबोटेंंच्या समर्थनार्थ बुधवारी राज्यभर महामोर्च्यांचे आयोजन

Sambhaji-Bhide guruji

पुणे : संभाजी भिडे गुरुजी आणि मिलिंद एकबोटे हे अत्यंत निस्वार्थीपणे राष्ट्रहिताचे काम करीत आहेत. तसेच या दोन्ही व्यक्ती जातपात न पाहता हे काम अनेक वर्षे सातत्याने करीत असूनही त्यांना कोरेगाव भिमा प्रकरणामध्ये निष्कारण गोवले गेले आहे. त्यामुळे याविरोधात आणि गुरुजींच्या समर्थनार्थ बुधवार, दि २८ मार्च रोजी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हाधिका-यांना महामोर्चा काढून निवेदन देण्यात येणार आहे. श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचा पुणे जिल्ह्याचा महामोर्चा शनिवारवाडा येथून सकाळी १०.३० वाजता सुरु होणार असून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती संघटनेचे पुणे महानगर कार्यवाह प्रा.पराशर मोने यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी जिल्हाप्रमुख संजय जढर, मुकुंद मासाळ, संजय पासलकर, अविनाश मरकळे, ओंकार लांडगे, संतोष गोपाळ आदी उपस्थित होते. शनिवारवाडयापासून निघणारा मोर्चा लाल महाल, फडके हौद चौक, दारुवाला पूल, १५ आॅगस्ट चौक, नरपतगिरी चौकामार्गे जिल्हाधिकारी कार्यालय येथे जाणार आहे. यामध्ये हजारो नागरिक सहभागी होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.पुणे शहरातही हा मोर्चा निघणार असून मोठ्या संख्येने भिडे समर्थक सहभागी होणार आहे या महामोर्चामध्ये बजरंग दल, समस्त हिंदू आघाडी, हिंदू जन जागृती, विविध गणेश मंडळ यात सहभागी होणार आहेत.

shri shivpratishan hindusthan

प्रा.पराशर मोने म्हणाले, भिडे गुरुजी आणि मिलिंद एकबोटे या राष्ट्रभक्तांवरील खोटे गुन्हे मागे घेण्यात यावे, अशी प्रमुख मागणी या महामोर्चाद्वारे सर्व महाराष्ट्रभरातून केली जाणार आहे. तसेच ज्या लोकांनी त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले आहेत, त्यांची चौकशी करावी, अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिका-यांना देण्यात येईल.

ते पुढे म्हणाले, प्रकाश आंबेडकरांनी ज्यांच्या सांगण्यावरून ही नावे घेतली, त्यांचीदेखील कसून चौकशी झाली पाहिजे आणि त्यासाठी त्यांना ताब्यात घेण्यात यावे. दंगलीच्या आधीच्या दिवशी म्हणजेच ३१ डिसेंबर रोजी पुण्यात शनिवारवाडा येथे एल्गार परिषद भरविण्यात आली होती. या परिषदेच्या निमंत्रण पत्रकातच विद्वेषपूर्ण लिखाण केले होते. तसेच या एल्गार परिषदेला उपस्थित असणा-या आणि चिथावणीखोर भाषणे देणा-या जिग्नेश मेवाणी, उमर खालिद आणि बी.जी. कोळसे पाटील यांना देखील चौकशीसाठी तात्काळ ताब्यात घेण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन संपूर्ण महाराष्ट्रभरातून दिले जाणार आहे. या प्रकरणाची निष्पक्षपातीपणे चौकशी व्हावी, यासाठी भिडे गुरुजी पहिल्या दिवसापासूनच आग्रही आहेत.

संजय जढर म्हणाले, आपले संपूर्ण जीवन भिडे गुरुजींनी देश, देव आणि धर्मासाठी व्यतीत केले आहे आणि असंख्य युवकांना राष्ट्राच्या कार्यात सहभागी करून घेतले आहे. तसेच आजवर लक्षावधी युवकांना जगण्याची उदात्त दिशा दाखवली आहे. विशेष म्हणजे स्वत: तसे जगून त्यांनी इतरांना हा मार्ग दाखवला आहे. लाखों युवकांनी आयुष्यात प्रथम शिवचरित्र वाचले, ते भिडे गुरुजींमुळेच! शिवछत्रपतींच्या गड-दुर्गांकडे शिवछत्रपती विद्या शिकवणारी विद्यापीठे म्हणून पाहण्याची दृष्टी लाखो युवकांना गुरुजींमुळेच मिळाली.

ते पुढे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज हे बीजमंत्र अंत:करणात धरून अत्यंत उदात्त जीवन जगण्याची प्रेरणा देखील गुरुजींच्यामुळेच लक्षावधी युवकांना मिळाली आहे. त्यांना खोट्या आरोपाखाली अटक करण्याचे कारस्थान रचले गेले आहे. स्वत:च्या राजकीय स्वाथार्साठी देशहिताचा बळी देणारे लोक या सर्व प्रकाराच्या मुळाशी आहेत. अर्थात साधुसंतांनी देखील असाच त्रास त्यांच्या त्यांच्या काळात सहन करावा लागलेला आहे. गुरुजींचा सदर प्रकरणाची काडीमात्र संबंध नाही. गेले अनेक वर्षे गुरूजी त्या परिसरात देखील गेलेले नाहीत. परंतु प्रसारमाध्यमांचा वापर करून राजकीय हेतूने हा अपप्रचार गेले दोन महिने सुरू आहे. यामुळे राष्ट्रीय ऐक्यास बाधा पोहोचत असून राष्ट्राचे अपरिमित नुकसान होत आहे. याला विरोध करण्याकरीता हा मोर्चा राज्यभर काढण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

1 Comment

Click here to post a comment