चर्चा तर होणारच… काँग्रेसचे इंधन दरवाढी विरोधात ‘लॉलीपॉप’ आंदोलन

congress

इंदापूर : महागाई मुळे सामन्यांच्या खिशाला दररोज कात्री लागत असताना गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेली इंधन दरवाढ आज देखील कायम आहे. शंभरीच्या जवळ गेलेल्या पेट्रोल आणि डीझेल मध्ये सातत्याने वाढ कायम आहे. काही शहरांमध्ये पेट्रोलने या आधीच शंभरी पार केली आहे. या विरोधात सामान्यांसह विरोधी पक्ष देखील आक्रमक होत आहेत.

राज्यात देखील इंधनाच्या दरांनी नवे विक्रम केले असून सत्तेतील महाविकास आघाडीने इंधन दरवाढीचं खापर केंद्र सरकारवर फोडलं आहे. देशभरात इंधन दरवाढी विरोधात काँग्रेसने आंदोलन सुरु केलं असून राज्यात देखील काँग्रेस आक्रमक झाली आहे. इंदापूरमध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीने अनोखं ‘लॉलीपॉप’ आंदोलन करण्यात आले.

केंद्रातील भाजपा सरकार हे व्यापारी विचाराचे सरकार आहे. संपूर्ण देश विकायला काढला असून, देशातील सर्वच शासकीय कंपन्या खासगीकरण चालू आहे. कोरोनासारख्या महामारीच्या अत्यंत बिकट काळात देखील सरकार अत्यावश्यक असणाऱ्या पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅस याकडे नफेखोरीच्या नजरेतून बघत आहे, असा आरोप देखील इंदापूर काँग्रेसच्या नेत्यांकडून करण्यात आला आहे. इंदापूर तालुका काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष स्वप्नील सावंत यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी पेट्रोल पंपावर वाहन चालकांना ‘लॉलीपॉप’ वाटप करून निषेध नोंदवण्यात आला.

महत्वाच्या बातम्या