fbpx

काँग्रेस पक्ष राष्ट्रवादीच्या दावणीला बांधला गेलाय : विखे पाटील

टीम महाराष्ट्र देशा- लोकसभा निवडणुकीचा निकाल सुरू आहे. दरम्यान, महायुती ४४ तर कॉंग्रेस- राष्ट्रवादी आघाडी ३ जागांवर आघाडीवर तर वंचित बहुजन आघाडी १ जागेवर आघाडीवर आहे. याचदरम्यान कॉंग्रेस – राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत.राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी कॉंग्रेसच्या अंतर्गत वादावरून टीका केली आहे. महायुतीच्या आघाडीवर असलेल्या जागांचा निकाल पाहता काँग्रेसच्या अंतर्गत वादाचा राष्ट्रवादी व काँग्रेस आघाडीला फटका बसला आहे.’ असा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.

तर दुसऱ्या बाजूला आता २०१४ च्या लोकसभा निवडणुकीप्रमाणेच यंदाच्या निवडणुकीतही राज्यात काँग्रेसला पुन्हा एकदा मोठा फटका बसणार असल्याचे चित्र जवळ-जवळ स्पष्ट झाले आहे. लोकसभेच्या मतमोजणीतून राज्यात काँग्रेसचे अपयश समोर येण्यास सुरुवात झाली आहे. आपल्या पक्षाच्या या कामगिरीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी पक्षाला घरचा आहेर दिला. काँग्रेस पक्ष राष्ट्रवादीच्या दावणीला बांधलेला पक्ष असल्याची प्रतिक्रिया त्यांनी एबीपी माझा वृत्तवाहिनीला दिली.

ज्यावेळी त्यांना तुम्ही आता भाजपमध्ये प्रवेश करणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी मोदींवर स्तुती सुमने उधळत भविष्याच्या वाटचालीसाठी काही निर्णय घ्यावे लागतील, असे सांगितले. कार्यकर्त्ये जो निर्णय घेतील तो माझा निर्णय असेल, अशा शब्दांत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचे संकेत दिले आहेत.