fbpx

पार्थ पवार यांचे वैयक्तिक फोटो व्हायरल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

टीम महाराष्ट्र देशा : मावळ लोकसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार आणि अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांचे वैयक्तिक फोटो ‘सोशल मीडिया’वर व्हायरल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा वैशाली नागवडे यांनी फिर्याद दिली आहे.

त्यानुसार पीसीएमसी शिवसेना फेसबुक पेजवरील इसम, निखील देवकाते-पाटील, श्रीमंत व इतर व्हाट्सअप् ग्रुप वर फोटो व्हायरल करणा-यांविरुद्ध चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी आणि निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार केली होती.

विरोधी पक्षाने युवा उमेदवार पार्थ पवार यांची विनाकारण बदनामी करण्यासाठी त्यांच्या महाविद्यालयीन जीवनातील खासगी फोटो शिवसेनेच्या फेसबुक पेज तसेच व्हाट्सअप ग्रुप यासारख्या सोशल मीडियात व्हायरल केले. निवडणुकीच्या कालावधीमध्ये अशा प्रकारचे फोटो व्हायरल होत असल्याने राष्ट्रवादीच्या उमेदवाराचे चारित्र्य मलिन होत आहे, असे तक्रारीत म्हटले आहे. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून फोटो, व्हिडीओ व्हायरल करणा-यांचा शोध घेतला जात आहे.